भंडारा (Bhandara) : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगेच्या नवनिर्मानाधीन पुलाच्या मध्यभागी रस्त्याला एका ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा संबंधित विभागाने बुजविण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक आहे. त्यामुळे पुलाच्या मध्यभागी खड्डा नेमका कशामुळे पडला याचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
हा रस्ता व पूल राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येत असल्याने ही जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. मनसर तुमसर गोंदिया असा हा राष्ट्रीय महामार्ग असून, माडगी शिवारातील वैनगंगा नदीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतुकीकरिता पुलाचे बांधकाम केले आहे. येथे वैनगंगा नदी पात्र हे विस्तीर्ण आहे. राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात चोवीस तास जड वाहतूक सुरू असते. या पुलावर काही दिवसांपूर्वी एक मधोमध खड्डा पडला. या खड्ड्याचा आकार वाढत गेला. या पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे या खड्याने लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा खड्डा भरला; परंतु येथील जड वाहतकीमुळे या खड्यातील घातलेले सिमेंट काँक्रीट व इतर रासायनिक पदार्थ पुन्हा बाहेर निघत आहे. त्यामुळे हा खड्डा नेमका कशामुळे पडला, याच्या शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
यापूर्वी पडला होता पिलर :
या पुलाचे बांधकाम सुरू असताना नदीपात्रातील मधोमध असलेला एक पिलर येथे वाकला होता. त्यानंतर तो पिलर कोसळला होता. त्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने येथे निरीक्षण करून पुन्हा सिमेंट काँक्रीटचे पिलर तयार केले होते. हा पूल भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वपूर्ण पूल आहे. या पुलाला जुना समांतर पूल असून त्यावरून सध्या वाहतूक बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे दखल घेऊन संपूर्ण पुलाचे पुन्हा परीक्षण करण्याची गरज आहे.
अजूनपर्यंत रीतसर उद्घाटन नाही :
या पुलावरून वाहतूक सुरू होऊन एक ते सव्वा वर्षाच्या काळ लोटला तरी अजूनपर्यंत या पुलाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले नाही. उद्घाटन का करण्यात आले नाही, याबाबत कुणालाच माहिती नाही. आणि वाहतूक सुद्धा सुरु करण्यात आली.