Cm Tendernama
विदर्भ

547 कोटींच्या निधीवरून नेतेमंडळी का आले आमने-सामने?

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : भंडारा जिल्ह्यातील 102 कोटी रुपयांच्या जलपर्यटनासह नगर विकास मंत्रालया अंतर्गत विकासकामाच्या येणाऱ्या निधीवरून महायुतीमध्ये भंडारा जिल्ह्यात राजकारण सुरू झाले आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महायुतीमधील घटक पक्षांना डावलले, एवढेच नाही तर या समारंभात महायुतीमधील स्थानिक नेत्यांना स्थान न दिल्याची ओरड आता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

जलपर्यटन प्रकल्पाच्या उद्घाटनादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव कोनशिलेवर नसल्याचे पुढे आले. या मुद्यावरून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भोंडेकर यांच्या आयोजनावर नावबोट सुरू केली आहे. या वादादरम्यान, भाजपाच्या पराभवाला माजी मंत्री परिणय फुके जबाबदार असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी भोंडेकर यांनी केला होता. या दोन्ही मुद्यांवरून आता भाजपाने भोंडेकर यांना घेरण्याची रणनीती चालविली आहे. समारंभात भाजपाच्या नेत्यांना डावलल्याचा आणि निमंत्रणही वेळेवर व्हाटॅसअॅपवरून पाठविल्याचा आरोप सुरू झाला आहे या आरोपांमध्ये भाजपाच्या वरच्या फळीतील नेत्यांनी अजून उडी घेतली नाही. मात्र पवनी, मोहाडी या ठिकाणांवरून थेट आरोप पदाधिकाऱ्यांकडून झाल्याने वादाला नवा रंग चढला आहे. हा महायुतीमधील घटक पक्षांना डावलण्याचा घाट लावण्याचा आरोप अनुप ढोके यांनी केला आहे. भूमिपूजनाच्या समारंभातून महायुतीमधील घटक पक्षांना डावलणे, हा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी घातलेला घाट आहे, असा थेट आरोप भाजपाचे भंडारा विधानसभा प्रमुख अनुप ढोके यांनी पवनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असून मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत तर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. 

102 कोटी रुपयांच्या जलपर्यटनाच्या भूमिपूजनप्रसंगी लावण्यात आलेल्या कोनशिलेवर फडणवीस यांचे नाव लिहिण्याचे भोंडेकर यांनी टाळले. एवढेच नाही तर, स्थानिक पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणसुद्धा कार्यक्रमाच्या अगदी वेळेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विकासका- मासाठी तुमसर व साकोली विधानसभा क्षेत्रातही मुख्यमंत्र्यांनी विकास निधी द्यावा, अशी मागणी माजी मंत्री परिणय फुके यांनी केली होती. मात्र, फुके यांच्यामुळेच भाजपाचे नुकसान झाल्याचे आरोप भोंडेकर यांनी केला. ही गर्विष्ठपणाची भाषा असल्याने आपण भोंडेकर यांचा निषेध करीत असल्याचे ढोके यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. पवनीतील या पत्रकार परिषदेला प्रदेश किसान आघाडी महामंत्री राजेंद्र फुलबांधे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जिभकाटे, युवा मोर्चा प्रदेश सचिव तिलक वैद्य, पवनी शहर अध्यक्ष मच्छिंद्र हटवार, पवनी तालुका अध्यक्ष मोहन सुरकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही सर्व महायुतीचे घटक पक्ष आहोत. स्थानिक आमदार या नात्याने नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्र्यांपुढे जलपर्यटनाचा प्रकल्प मांडला. गोसेखुर्द प्रकल्पामुळे स्थानिकांचे झालेले नुकसान भरुन निघावे, हा त्यामागील हेतु होता. महायुतीमधील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला पाठबळ दिले. या उद्घाटन समारंभाच्या कोनशीलेवर नाव सुटणे हा विषय आमचा नसुन ती प्रशासनाची चुक आहे. मात्र, या विषयावरुन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पोटदुखी ठेऊ नये. संबंधित फलक दुरुस्त करण्यासाठी आम्ही पुन्हा प्रशासनाला विनंती करु. महायुतीमध्ये सर्वजण समान आहेत. कोणाला यात डावलण्याचा प्रश्नच येत नाही. अशी प्रतिक्रिया शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाध्यक्ष अनिल गायधने यांनी दिली .