Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा; पुरवठादाराचे ४ चेक बाऊंस

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार मनोहर साकोरे याने ६७ लाख रुपये परत करून स्वतःच्या बचावासाठी धडपड सुरू केली आहे. पैसे परत केले म्हणजे यातून सहीसलामत सुटू हा त्याचा भ्रम पोलिसांनी अटक केल्याने फुटला आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाशिवाय इतर विभागात केलेले घोटाळे उघडकीस येऊ नये याकरिता त्याने परतफेडीसाठी दिलेले प्रत्येकी १३ लाख रुपयांचे ४ चेक बाऊंस झाले आहेत.

आरोग्य विभागातील स्टेशनरी पुरवठ्‍याच्या नावावर ६२ लाख रुपयांच्या देयकांची उचल केल्याने महापालिकेने सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पुरवठादार मनोहर साकोरे याच्या सह वित्त व लेखा विभागातील दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या बयानावरून आणखी दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. साकोरे याच्या विविध फर्ममार्फत सुमारे चाळीस वर्षांपासून महापालिकेला स्टेशनरीची पुरवठा केला जात आहे. चुकीने ६७ लाखांच्या देयकाची उचल केली असे दर्शवून यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी साकोरेच्या फर्ममार्फत ६७ लाख रुपये महापालिका प्रशासनाला परत करण्यात आले आहे. साकोरे यांनी आरोग्य विभागाशिवाय जन्म व मृत्यू विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागातही ६० आणि ७४ लाख रुपयांच्या स्टेशनरीचा पुरवठा केला आहे. त्याच्या परतफेडीसाठी १३ लाखांचे एकूण चार चेक देण्यात आले होती. ही एकूण रक्कम ५२ लाख इतकी आहे. हे चारही चेक बाऊंस झाले आहेत.

सोकावलेल्या साकारेंच्या सात फर्म
मनोहर साकोरे यांनी महापालिकेच्या विविध विभागाला स्टेशनरीचा पुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या नावाने एकूण सात फर्म स्थापन केल्या आहेत. अधिकाऱ्यांसोबत थेट लागेबंध असल्याने त्याच्याच फर्ममार्फत प्रत्येक विभागामार्फत साहित्याची खरेदी केली जात होती. त्यामुळे हा स्टेशनरी घोटाळा कोट्यवधींच्या घरात असल्याचा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आरोग्य विभागातील खरेदीचे ६७ लाखांचे देयके विभाग प्रमुख्याच्या स्वाक्षरीशिवाय उचलण्यात आल्याचे साकोरेच्या फर्ममार्फत अनेक वर्षांपासून सुरू असलेले घोटाळे चव्हाट्‍यावर आले आहेत.

घोटाळे शोधण्यासाठी तीन सदस्यीच समिती
महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची अनेक वर्षांपासून सुरू असल्याच्या संशय असल्याने स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर यांनी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे यांच्या अध्यक्षतेत तीन नगरसेवकांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फात पाच वर्षांतील घोटाळे शोधण्यात येणार आहेत. स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी महापालिका प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त मीना यांची आधीच एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत एकाच वर्षातील घोटाळ्यांचा शोध घेतला जाणार आहे. कुठलाही पुरवठादार पहिल्याच ऑर्डरमध्ये ६७ लाखांचा घोटाळा करू शकत नाही. यापूर्वीचे घोटाळे पचल्याने असल्याने त्याची हिंमत वाढली असावी. हे बघता हा घोटाळा अनेक वर्षांपासून सुरू असावा असे दिसून येते. सध्या फक्त आरोग्य विभागातील स्टेशनरी खरेदीचा घोटाळा उघडकीस आला आहे. इतरही विभागांना मोठ्‍या प्रमाणात स्टेशनरीचा पुरवठा होतो. त्यातही असे प्रकार घडले असल्याने ही समिती व्यापक चौकशी करणार असल्याचे प्रकाश भोयर यांनी यांनी सांगितले. बालपांडे यांच्यासह चौकशी समितीत नगरसेविका प्रगती पाटील, आयशा उईके यांचा समावेश आहे. स्टेशनरी घोटाळा उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या वित्त विभागातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. वित्तविभागातील मोहन पडवंशी यास पोलिसांनी कोठडीत ठेवले आहे. तसेच पुरवठादार मनोहर साकोरे यांच्या विविध फर्ममार्फत सुमारे चाळीस वर्षांपासून स्टेशनरीची खरेदी केली जात आहे.