Petrol Pump Tendernama
विदर्भ

'नो पर्चेस डे'मुळे नागपुरात पेट्रोलची काळ्या बाजारात विक्री

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : डिलर्सने ३१ मे रोजी ‘नो पर्चेस डे‘ (No Purchase Day) पाळल्याने नागपूर जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप मंगळवारपासूनच बंद आहेत. पेट्रोलच शिल्लक नाही, असे सांगण्यात येत आहे. याचा फायदा घेत विशेषतः ग्रामीण भागातील काही पेट्रोल पंपावर चक्क बॉटलमधून १२० रुपये लिटरने पेट्रोलची विक्री केली जात आहे.

पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. याची दखल घेत केंद्र सरकारने अबकारी दरात कपात केली. त्यामुळे सुमारे नऊ रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाले आहे. मात्र त्यामुळे डिलर्सच्या कमिशनमध्ये कपात झाली. ते त्यांना रुचले नाही. एकतर कमिशन वाढवून द्या किंवा भरपाई द्या अशी मागणी त्यांनी केली. त्याकरिता देशभरातील पेट्रोलियम डिलर्सनी ३१ मे रोजी नो-पर्चेस डे पाळण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे झालेल्या नुकसानीची केंद्र सरकारने भरपाईची द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

दबावतंत्राचा वापर करण्यासाठी इंधन कंपन्यांकडून ३१ तारखेला पेट्रोल खरेदी करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी निम्मे पेट्रोल पंप बंद होते. मंगळवारी साठा संपल्याने काही मोजके पंप वगळता सर्वच बंद होते. आज बुधवारी त्यांच्याकडी साठाही संपला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच पेट्रोलसाठी अनेक वाहनचालकांची भटकंती सुरू होती. पेट्रोल संपल्याने अनेक गाड्या रस्त्यावरच उभ्या आहेत. ग्रामीण भागातून अनेकांना बॉटलमधून पेट्रोल आणावे लागले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १२० रुपये लिटरने पेट्रोल खरेदी केले. आजा पेट्रोलचा साठा शहरात पोहचला नाही तर मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि डीलरचे कमिशन वाढविण्यासाठी नो पर्चेस डे राबविण्यात आला. ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरिता आम्ही पेट्रोल पंप सुरू ठेवले होते. मात्र काही पंपावरचा साठ संपल्याने ते बंद ठेवावे लागले.
- अमित गुप्ता, अध्यक्ष, विदर्भ पेट्रोल डिलर्स असोसिएशन