नागपूर (Nagpur) : ऐन पावसाच्या तोंडावर रस्ते, जलवाहिनी, सिवेज लाईनची कामे सुरू करण्यात आली. आता पावसामुळे ही कामे अर्धवट असून, खोदकामामुळे वाहनधारकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे पावसाने नाकी नऊ आणले असतानाच खोदलेले रस्ते, जलवाहिनीसाठी केलेल्या खोदकामामुळे चिखलातून मार्ग काढण्याची दुहेरी कसरत नागरिकांना करावी लागत आहे.
उन्हाळ्यात कामे उरकण्यावर महापालिकेने भर न दिल्याने आता पावसात खोदकामांमुळे नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. अनेक रस्त्यांवर तर गिट्टी पसरली असून, वाहने काढताना नागरिकांचा चांगलाच कस लागत असल्याचे हुडकेश्वर पोलिस स्टेशन ते पिपळा रोडवर दिसून येत आहे. पिपळा रोडचे काम पावसापूर्वी सुरू केल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यांसाठी कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले. काही भागांमध्ये मोठी गिट्टी टाकण्यात आली आहे. हा रस्ता थेट पिवळा पूलापर्यंत तयार होत आहे. या रस्त्यांवर गजानननगर, शारदानगर, चक्रपाणीनगरासह अनेक वस्त्या आहेत. या वस्त्यांतील नागरिकांना आता घरापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात संततधार सुरू असून पावसाचे पाणीही या रस्त्यांवर जमा होत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा वाहनांची चाके चिखलात रुतत आहेत.
चारचाकीधारकच नव्हे तर दुचाकीधारक तर घसरून पडण्याच्याही अनेक घटना घडल्या. या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यांवरून विद्यार्थी, चाकरमाने, व्यायसायिक, महिला आदी दररोज ये-जा करतात. या सर्वांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्याची स्थिती अनेक भागात अशीच आहेत. याशिवाय खरबी परिसरातील साईनगरात काही दिवसांपूर्वी सिवेज लाईनसाठी खोदकाम करण्यात आले. पावसामुळे कामावरून मजूर गायब झाले असून, कंत्राटदाराने या कामाकडे सध्यातरी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. परंतु सिवेज लाईनच्या चेंबरसाठी खोदलेला खड्डा आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून मातीमुळे चिखलही झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
खोदलेल्या खड्ड्यांत सदोष भरण
अयोध्यानगरातील श्रीरामवाडी ते मानेवाडा रोडवरील बालाजीनगर पूर्वपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. परंतु या रस्त्यावर खोदकामात केवळ मातीचा भरणा करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण रोडवर चिखल असून, काही भागांत खोल खड्डाही तयार झाला. विशेष म्हणजे हा रस्ता अरुंद असून, नागरिकांना घरातून वाहने काढणेही कठीण झाले आहे. अनेकदा रात्रीच्या काळोखात या नालीत नागरिकांची पाय रुतत आहेत. त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.