Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : 'या' मार्गावरील पूल धोकादायक; खडबडीत पुलावरून जीवघेणा प्रवास

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : सरकारच्या तिजोरीतून विविध विकासकामांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र कामांचा दर्जा राखला जात नसल्याने अल्पावधीत डागडुजीची वेळ येते. अशीच स्थिती पारशिवनी-भानेगाव राज्य मार्गावरील शिंगोरी-साहोली मार्गाची झाली आहे. या मार्गावर कन्हान नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, पुलावरून वाहन काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. 

पारशिवनी भानेगाव मार्गानी दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. याच मार्गावर शिंगोरी साहोलीदरम्यान कन्हान नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले तर मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पुलावरील दोन्ही बाजूंचे डांबर उखडले असून, मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून, खड्याचा अंदाज येत नसल्याने वाहन अनियंत्रित होऊन नदीपात्रात पडण्याचा धोका आहे. याच पुलावरून विविध विभागांचे कर्मचारी, विद्यार्थी, वाळूचे अवजड ट्रक, कोळसा भरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. संबंधित विभागाचे अधिकारी या समस्येकडे कानाडोळा करीत असतील तर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी घेतील का ? तत्काळ या समस्येकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी. -वैभव खोब्रागडे, पारशिवनी पुलावरील दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी भरलेल्या खड्यांमधून मार्ग काढायचा कसा असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी युवा नेते शुभम राऊत यांनी केली.

कोट्यवधीचा खर्च पाण्यात : 

याच मार्गावरून संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी नियमित ये-जा करतात. येथील जीवघेण्या परिस्थितीची त्यांना संपूर्ण माहिती आहे. तरीही खड्डे बुजविण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाही. मागील काळात याच मार्गावरील रस्ता डांबरीकरणावर कोट्यवधीचा खर्च करण्यात आला; मात्र निकृष्ट कामामुळे रस्त्याची स्थिती जैसे थे झाली. त्यामुळे कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेल्याची स्थानिकांची तक्रार आहे. संबंधित विभागाने तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक, परिसरातील स्थानिक नागरिकांची आहे. पावसाळा असल्याने पुलावरिल खड्यांची दुरुस्ती करणे शक्य नव्हते. खड्यांमध्ये पाणी साचत्याने डांबरीकरण करता आले नाही. मात्र आगामी दोन- चार दिवसांत रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल. तसे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, सावनेर चे उपविभागीय अभियंता सुनीलकुमार दमाहे यांनी दिली.