नागपूर (Nagpur) : महापालिकेतील स्टेशन घोटाळा चौकशी समितीपुढे अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावर समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यामुळे चौकशी समितीची बैठक चांगलीच वादळी झाली.
स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून काल, गुरुवारी या घोटाळ्याच्या चौकशी समितीपुढे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, मुख्य अभियंता खवले, उपायुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आदी अधिकारी हजर झाले होते. या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच आयुक्तांनी गठीत केलेल्या समितीपुढे घोटाळ्यासंदर्भात साक्ष नोंदविली असून त्यावर ठाम असल्याचे सांगितले. याबाबतचा अहवाल आज समितीकडे देण्यासाठी चौकशी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना विचारपूस केली. यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एका अधिकाऱ्यांनी आपला तोरा दाखवित इंग्रजीत संभाषण सुरू केले. ठाकरे यांनीही त्यांच्याच भाषेत त्यांना सुनावले. एवढेच नव्हे तर ठाकरे यांनी या अधिकाऱ्यांना संविधानाची जाणीव करून देत सभागृहाने गठीत केलेल्या समितीपुढे तुम्ही बसले आहेत, असे सांगितले. एकूणच चौकशी समितीची आज झालेली बैठक चांगलीच वादळी ठरली.
प्रशासनाने सोपविला अहवाल
स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना यांच्या नेतृत्त्वात समिती गठीत केली होती. या समितीने अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली होती. त्यानंतर सभागृहात महापौरांनी अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्त्वात समिती गठीत केली. ठाकरे समिती या घोटाळ्याची चौकशी करीत असून आज अतिरिक्त आयुक्त मीना यांनी त्यांनी नोंदविलेल्या साक्षी व इतर कागदपत्राचा अहवाल ठाकरे यांच्याकडे सोपविला.
सोमवारी अहवालाची पाहणी
प्रशासनाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल आज दिला असून सोमवारी या अहवालाची पाहणी केली जाईल, असे चौकशी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सांगितले. प्रशासनाच्या समितीने १०० पानांचा अहवाल तयार केला. यातील १३ पानामध्ये चौकशीसंबंधी माहिती देण्यात आली आहे तर इतर पानांमध्ये कागदपत्रे आदी आहे, असेही ठाकरे म्हणाले.