Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nitin Gadkari : अडचणींवर मात करून साकारला 'हा' प्रकल्प! काय म्हणाले गडकरी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महाल परिसराला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे, शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून देखील महालला ओळखल्या जाते. अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी असणाऱ्या बुधवार बाजारात मनपाद्वारे उभारल्या जाणाऱ्या 'बी पार्क'च्या माध्यमातून परिसराला नवीन रूप मिळणार असल्याचे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बुधवार बाजार, महाल येथील अत्याधुनिक व्यावसायिक संकुल व शॉपिंग कॉम्पलेक्स तसेच मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील गांधीबाग झोन येथील टिमकी, भानखेडा, संत्रा मार्केट, नंदाजी नगर, जैस्वाडी आणि सतरंजीपुरा झोन येथील लाडपुरा येथील आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, महाल परिसरात रस्ते मोठे करणे खूप आवश्यक होते. या ठिकाणी पार्किंगला जागा उपलब्ध नव्हती. संपूर्ण शहर बदलत असताना महाल भागाचा ही विकास होणे आवश्यक आहे. व्यावसायिक संकुल उभे झाल्यावर महालातील रस्ते मोकळा श्वास घेतील. असे अनेक मार्केट्स नागपुरात सुरू झाले तर शहराच्या रस्त्यावरील गर्दी कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

तसेच गडकरी म्हणाले, या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या; पण त्यावर मात करून प्रकल्पाचे काम सुरू होत आहे. त्यामुळे हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. कुणाचे ही नुकसान न करता हा प्रकल्प उभा होत आहे. चांगले काम झाले पाहिजे, लोकांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत, हीच भावना आहे. या प्रकल्पामुळे मनपाला 136 कोटी रुपयांचा नफा मिळणार आहे. गरिबांचे नुकसान होणार नाही. लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आपले शहर देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम शहर व्हावे, असा माझा प्रयत्न आहे, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेला मिळणार 136 कोटीचा नफा : 

डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले की, नागपूर शहरातील सर्वात जुनी लोकवस्ती महाल येथील होणाऱ्या विविध विकास कामांमुळे स्थानिक नागरिकांसह शहराचा देखील विकास साधला जात आहे.  प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेला 136 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होणार होईल.

अत्याधुनिक व्यावसायिक संकुल व शॉपिंग कॉम्पलेक्स ही वास्तू मध्य नागपूरच्या व्यावसायिक जगतामध्ये लोकांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास भर घालेल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला. 

अशी असणार बाजाराची संरचना : 

सर्व सोयीसुविधा असणारी भव्य अत्याधुनिक व्यावसायिक संकुल व शॉपिंग कॉम्पलेक्स ही वास्तू बुधवार बाजार येथे उभारली जाणार असल्याचे सांगत त्यांनी या भव्य वास्तूच्या डिजाइनचे काम वास्तु शिल्पकार अशोक मोखा यांनी केले असल्याचे सांगितले. तसेच मे. विदर्भ इन्फोटेक प्रा. लि. नागपूर हे जागेचे विकासक आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा अवधी 36 महिने अर्थात 3 वर्ष असणार असल्याचे सांगितले. या संकुलात 332 दुकांने असतील यामध्ये आधीच्या 245 दुकानांचे पुर्नवसन केले जाणार असून 87 नवीन दुकाने असतील. याशिवाय 133 ओटे यांचा समावेश असेल, असेही डॉ. चौधरी यांनी सांगितेले.

याशिवाय 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत नागपूर महानगरपालिका करिता 113 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर मंजूर करण्यात आलेले आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत मिळणार आहे. तसेच नोंदणी शुल्क घेतल्या जाणार नाही. प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक सेवा यामार्फत उपलब्ध होतील. तसेच बाह्यरुग्ण सेवा, गरोदर माता तपासणी, लसीकरण (माता व बालक), उच्च रक्तदाब व मधुमेह निदान व उपचार आदी सोयी दिल्या जाणार आहे. तसेच आवश्यक निवडक रक्त तपासणी ही HLL मार्फत करण्यात येणार आहे. यामाध्यमातून नागरिकांना चांगल्या सोयी मिळतील व नागरीक मोठ्या संख्येने लाभ घेतील याबद्दल विश्वास व्यक्त केले.