Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

कमतरता नसताना पाणी टंचाई का?; गडकरींनी खडसावले 'या' कंपनीला

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : यंदा पुरेसा पाऊस पडला, जलसाठे अद्याप रिकामे झाले नाहीत, असे असताना नागरिकांना पाणी पुरवठा का केला जात नाही अशी विचारणा करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाणी पुरवठा करण्याऱ्या ओसीडब्लू (OCW) कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

नागपूरमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी गडकरी यांनीच पुढाकार घेतला होता. त्यानुसार चोवीस बाय सेवन ही योजना15 वर्षांपूर्वी नागपूर महापालिकेने हाती घेतली. पाणी वितरणाचे आणि गळती, चोरी, नव्या जलवाहिन्या तसेच पाणिपट्टी वसुलीचे कंत्राट ओसीडब्लू या खाजगी कंपनीला देण्यात आले. त्या नंतर बऱ्याच प्रमाणात पाणी पुरवठा सुरळीत होऊ लागला. मागील 10 वर्षे उन्हाळ्यात एकही मोर्चा महापालिकेवर धडकला नाही, कोणी मडके फोडले नाही. याचे संपूर्ण श्रेय भाजपने आपल्याकडे घेतले. सलग दोन निवडणुका जिंकल्या. आता सध्या महापालिकेचा कार्यकाळ संपला आहे. आयुक्तांना प्रशासक म्हणून नेमले आहे. तेव्हापासून अचानक शहरात पाणि टंचाई निर्माण झाली. त्यामुळे भाजपलाही आता आंदोलन करावे लागत आहे. ही टंचाई कृत्रिम असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासन गडकरी यांच्याशिवाय ऐकत नाही.

गडकरी यांनी थेट बैठक लावली. शहराला कन्हान व पेंचमधून मिळणारे पाणी हे 700 एमएलडीपर्यंत मिळत असताना व पाण्याची कोणतीही कमी नसताना नागरिकांना पाणीटंचाईला का तोंड द्यावे लागत आहे, अशी विचारणा ओसीडब्ल्यू-व्हिओलिया या कंपन्यांच्या अधिकार्‍यांना केली. तसेच पाणी वितरणात जे दोषी आढळतील त्यांना बरखास्त करा. पाईपलाईनचे नेटवर्क असलेल्या ठिकाणी सर्व नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे, असे निर्देशही गडकरी यांनी दिले. या बैठकीत गडकरी यांनी व्हिओलियाच्या कार्यपध्दतीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली.

या बैठकीला व्हिओलियाचे व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. प्रामुख्याने आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी, अविनाश ठाकरे आदी उपस्थित होते. येत्या उन्हाळ्यापूर्वी पाणीपुरवठा करणार्‍या टाक्यांचे काम पूर्ण करायचे ठरले असताना अजूनपर्यंत टाक्यांचे काम का पूर्ण झाले नाही. काही पाण्याच्या टाक्यांचे काम सुरु आहे, पण टाक्यांपर्यंत पाईपलाईन गेली नाही यासाठी व्हिओलिया जबाबदार असल्याचा ठपका आमदारांनी ठेवला. महालात, हुडकेश्वर या भागात पाणी कमी येत असून पूर्ण दबावाने पाणी येत नसल्याकडे प्रवीण दटके यांनी लक्ष वेधले.

गेल्या 10 वर्षांपासून पाईपलाईनच्या नेटवर्कची देखभाल दुरुस्ती केली नसल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आल्यामुळे व्हिओलियाचे पैसे रोखण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. वितरणात असलेल्या तांत्रिक त्रुटीसाठी कोण जबाबदार आहे, का पाणी मिळत नाही, अशी विचारणा ना. गडकरी यांनी केल्यानंतर कोणतेही समाधानकारक उत्तर व्हिओलियाकडून मिळाले नाही. मार्च-एप्रिलमध्ये पाण्याची मागणी वाढलेली असते, हे माहित असतानाही त्याप्रमाणे कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचा ठपकाही व्हिओलियावर ठेवण्यात आला. कन्हान-कामठी, पेंचमधून दररोज किती पाणी मिळते याची माहितीही गडकरी यांनी घेतली. तसेच नागपूरशेजारच्या परिसरातही पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचे गडकरी म्हणाले.

शहराला आम्ही पाणी उपलब्ध करून दिले. आता पुरवठा करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. पेंच, तोतलाडोह, कन्हान येथे पाणी उपलब्ध आहे. शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या पाण्याने भरल्या गेल्या पाहिजे, याकडे व्हिओलियाने लक्ष द्यायला पाहिजे. टाक्या पाण्याने पूर्ण भरा. जेथे पाईपलाईनचे नेटवर्क नाही, तेथे टँकरने पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचवा. या संदर्भात व्हिओलियाचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी ना. गडकरी यांनी मोबाईलवरून चर्चा केली. नियोजन नसल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे या बैठकीत आढळून आले.