Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nitin Gadkari : नागपूर येणाऱ्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विदर्भाच्या विकासासाठी काय करता येईल, याच्या विचार मंथनासाठी ॲडव्हांटेज विदर्भ व खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीपासून वाशिम पर्यंत आणि बुलडाण्यापासून गडचिरोलीपर्यंत आम्ही चांगले रस्ते तयार केले.

पाणी, वीज, पायाभूत सुविधा, विस्तीर्ण रस्ते, तंत्रज्ञान यासह  केंद्रातून कोणतीही मदत लागल्यास तत्पर असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तर राज्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार आहेत. सोबतीला राज्याचे माजी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म लघू मध्यम मंत्री नारायण राणे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे .त्यामुळे आता विदर्भात विकास झाला पाहिजे. गुंतवणूकदारांनी आरोग्य, अभियांत्रिकी, औषधी,पर्यटन, हॉटेल व्यवसाय व अन्य लॉजिस्टिक सारख्या मोठ्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गडकरी फडणवीस यांचे डबल इंजिन विदर्भाचा सुवर्णकाळ : राणे

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भाचा पूर्ण अभ्यास आहे. कुठे काय निर्माण होऊ शकते, कोणत्या जिल्ह्याला कोणता उद्योग उपयोगी पडू शकते यशस्वी होऊ शकते, याची माहिती असणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा हा सुवर्णकाळ आहे. वीज, सुरक्षा,पायाभूत सुविधा आदी सर्व सुविधा विदर्भात उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विदर्भामध्ये गुंतवणूक करणे, ही गुंतवणूकदारांसाठीची सध्याची संधी आहे त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित गुंतवणूकदारांना केले. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतामध्ये, महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलरच्या इकॉनोमीमध्ये,नव्या जगाच्या भारतामध्ये आपला विदर्भ दिसायला पाहिजे. यासाठी सगळ्या उद्योजकांनी पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले.