Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

'या' कारणांमुळे मेट्रोच्या पाठीवर गडकरींची कौतुकाची थाप!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : सिंगल कॉलम पिलरवर मेट्रो रेल्वे आणि डबल डेकर पूल यशस्वीपणे उभारण्याचे काम करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) पाठीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कौतुकाची थाप दिली.

आशिया खंडात पहिल्यांदाच ३.१४ किलो मीटर लांबीचा डबल डेकर पूल महामेट्रोने उभारला आहे. याकरिता भूसंपादनाची गरज भासली नाही. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात बचत झाली. तसेच इंधन खर्चातही बचत होणार आहे. असाच आणखी एक ५.८ किलोमीटर लांबीचा पूल कामठी रोडवर उभारण्यात येत आहे. एनएचएआय व महामेट्रो या दोन्ही संस्था एकत्रितपणे या पुलाचा मार्ग प्रशस्त करीत आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी दोन्ही संस्थांना प्रशस्तपत्र प्रदान केले.

गडकरी म्हणाले, की मुंबई, पुणे येथेही असे पूल उभारण्यात येत आहेत. यापुढे ३० हजार वाहनांची ये-जा होणाऱ्या पुलांसाठी प्रिकास्ट तंत्रज्ञान वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ३० मीटर असते. मलेशियातून नवीन तंत्रज्ञान आणले आहे. त्यानुसार दोन पिलरमधील अंतर आता १२० मीटर करणे शक्य होते. यामुळे खर्चात बचत झाली आहे. येत्या काही दिवसाताच कामठी रोडवरील डबल डेकर पुलाचेही उद्घाटन होईल असेही गडकरी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, मेट्रो रेल्वे व डबल डेकर पुलाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या निमित्ताने गडकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. गडकरी यांनी आता ट्रॉली बस सेवाही सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. कळमना ते वासुदेवनगर हिंगणा आणि रिंगरोड ते डिफेन्सचा डीपीआर मेट्रोने लवकर तयार करून द्यावा, अशाही सूचना गडकरी यांनी दिल्या.