Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी नागपुरकरांना दिली गुड न्यूज! जागतिक दर्जाच्या 'या' प्रकल्पाची घोषणा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शहरात 12 एकर जागेत लवकरच जागतिक दर्जाच्या मोठ्या स्पोर्टस क्लबची निर्मिती करण्यात येईल. 100 कोटी रुपयांच्या उच्च दर्जाच्या क्लबची निर्मिती करण्याचे नियोजन असून, या क्लबमध्ये विविध खेळांचे उपक्रम वर्षभर आयोजित करता येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

खासदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या क्लबमध्ये व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो खो, जलतरण तलाव, टेबल टेनिस, लॉन टेनिस, योगा अशा भारतीय खेळांसह इतरही सर्व खेळांसंबंधी उपक्रम आयोजित करता येतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

आजघडीला क्लबच्या मेंबरशीपसाठी 25-25 लाख रुपये घेतले जातात. मात्र, नागपूरकरांसाठी आपण केवळ 10 लाख रुपयांच्या मेंबरशीपमध्ये हा जागतिक दर्जाचा क्लब उपलब्ध करून देणार आहोत, असे ते म्हणाले. सुरुवातीला एक हजार सदस्यांचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून याचे नियोजन करण्यात येणार आहे. हे आव्हान पूर्ण झाल्यानंतर यात बदल करता येतील. तसेच स्थानिक खेळाडूंना मोफत प्रवेश देण्याचा विचारही करण्यात येईल.

सामान्य माणसाला स्पोर्टस क्लबमध्ये जाता यावे, ही यामागची संकल्पना आहे, असे नमूद करीत शहरात खेळाशी संबंधित सवलती निर्माण करण्याच्या संकल्प असल्याचे गडकरी म्हणाले.

जागाही निश्चित

जागतिक दर्जाच्या या स्पोर्टस क्लबसाठी नागपूरमध्ये जागा निश्चित करण्यात आली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या कामासाठी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर समूह बी. जी. शिर्के यांच्या कंपनीला काम देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिर्के समूहासोबत नागपूर येथे नितीन गडकरी यांनी नुकतीच बैठक घेतल्याचेही नमूद केले.