नागपूर (Nagpur) : केंद्रातील मोदी सरकारमधील सर्वांत वेगवान मंत्री म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे प्रसिद्ध आहेत. दुसरीकडे गडकरींचे होमपीच असलेल्या नागपूर शहरातच याच्या उलट चित्र बघायला मिळते. नागपूर महापालिकेला (NMC) अवघ्या दोनशे मीटर पुलाची दुरुस्ती सहा महिन्यांपासून करता आलेली नाही. त्यामुळे रामदासपेठ (Ramdaspeth) सारख्या प्रचंड वर्दळीच्या भागात रोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीने नागपूरकर त्रस्त झाले आहेत.
रामदासपेठ आणि महाराजबागेला जोडणाऱ्या नाग नदीवरील पुलाला तडे गेले होते. तो केव्हाही कोसळण्याचा धोका होता. त्यामुळे महापालिकेने तातडीने पुलावरची वाहतूक बंद केली. या तुटलेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने आठ कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. पालिकेच्या निर्णयाचा हा वेग पाहता पुढील महिन्या, दोन महिन्यात या पुलाचे काम केले जाईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती.
या दरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले. राज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांचा जवळपास दोन आठवडे येथे राबता होता. असे असतानाही महापालिकेने कुठलीच तत्परता दाखविली नाही. आपल्याच गतीने काम सुरू ठेवले. आज सहा महिने उलटून गेल्यानंतरही पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रामदासपेठेतून विद्यापीठाकडे जाण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. याशिवाय वाहतुकीच्या कोंडीची डोकेदुखी सहन करावी लागते आहे.
बुटी हॉलजवळील पुलासोबतच रवीनगर चौकातील रस्त्याचे कामही अनेक महिन्यांपसून रखडले आहे. सध्या महापालिकेत प्रशासकाचे राज्य आहे. नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आली आहेत. त्यामुळे प्रशासनावर कोणाचा वचक नाही. अधिकारी संथ गतीने काम करीत आहेत. हे काम जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी एवढा वेळ का घेत आहेत, यावर लवकर तोडगा का नाही काढत, हा संशोधनाचा विषय आहे.
...तर आंदोलन करणार!
पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, दोन-चार दिवसांत हा प्रश्न महापालिकेकडे घेऊन जाऊ. अधिकाऱ्यांना अल्टीमेटम दिला जाईल. त्याची दखल घेतली नाही तर आंदोलन उभारले जाईल.