Nitin Gadkari, Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Nagpur: गडकरींच्या उपस्थितीत फडणवीसांची 100 कोटींची घोषणा

Devendra Fadnavis: नागपूर शहरात निर्माण होणाऱ्या क्रीडांगणांचे संकल्पचित्र व डिझाईन नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसारच; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे कुठलेच काम साधे सुधे नसते. त्यांचा छोट्यातला छोटा प्रकल्पही कोट्यवधीचा असतो. त्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही घोषणा कराताना शंभर कोटींची घोषणा करावी लागली.

नितीन गडकरी यांच्या खासदार क्रीडा महोत्सवाची (Khasdar Krida Mohatsav) सांगता झाली. समारोप समारंभाला गडकरी यांनी शहरातील क्रीडा विश्वाला बळकटी देण्यासाठी मैदानाच्या विकासाची संकल्पना मांडली. त्यावर फडणवीस यांनी मैदनांच्या विकासासाठी १०० कोटी देण्याची घोषणा केली.

मागील १५ दिवसांपासून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा रविवारी (ता. २२) डब्ल्यूडब्ल्यूई मधील वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन ग्रेट खली यांच्या विशेष उपस्थितीत यशवंत स्टेडियवर समारोप झाला. याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सहसंयोजक डॉ. पीयूष आंबुलकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, सर्व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर शहरात निर्माण होणाऱ्या क्रीडांगणांचे संकल्पचित्र व डिझाईन नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसारच तयार होईल व नागपूर सुधार प्रन्यास त्याची अंमलबजावणी करेल. धंतोली येथील यशवंत स्टेडियमचा पुनर्विकास प्रस्तावित असून, त्यासाठी आवश्यक सर्व परवानगी, युजरचेंज राज्य सरकारकडून लवकरच पूर्ण येतील. याशिवाय मानकापूर येथील क्रीडा संकुल अत्याधुनिक करून त्याच्या देखरेखी संदर्भात प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हॉकीचे ॲस्ट्रोटर्फ मैदान तयार करून त्यातून नागपूर शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी गडकरी यांनी खेळातून व्यक्तित्वाचा विकास होतो आणि त्यातून कर्तृत्व निर्माण होते. शहरातील प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी उत्तम मैदाने तयार करून देउन त्यातून त्यांच्या व्यक्तित्व विकासाला चालणा देणे हे ध्येय आहे, असे नमूद केले. 

नागपूर शहरातील किमान ३०० मैदाने उत्तम करून त्यावर रोज सकाळ, सायंकाळी १ लाखावर तरुण, महिला, ज्येष्ठ सर्वांनी खेळावे, अशी इच्छा यावेळी गडकरी व्यक्त केली.