NHAI Tendernama
विदर्भ

NHAI : ठेकेदाराशी हातमिळवणी करत अधिकाऱ्यांनी लावला 18 कोटींना चुना; गडकरी काय कारवाई करणार?

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : तळेगाव (श्याम पंत) ते आर्वी या 12 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाला गेल्या चार वर्षांपासून साडेसाती लागली आहे. आतापर्यंत दोन कंत्राटदार बदलण्यात आले असून, तिसऱ्याची नियुक्ती करण्यात आली; पण अद्यापही कामाचा थांगपत्ता नाही.

आतापर्यंत झालेल्या कामामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी हात मिळवणी करत काम न करताही तब्बल 18 कोटींचे देयक अदा करून शासनाला चुना लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

तळेगाव ते आर्वी या बारा किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये आतापर्यंत 70 कोटींचा निधी खर्च करण्यात आला असून यात निम्मेही काम पूर्णत्वास गेले नाही. या कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असून या विभागातील सर्वच अधिकारी कंत्राटदार एजन्सीच्या मर्जीत वावरत असल्याने चार

वर्षांनंतरही काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, हा महामार्ग अनेकांकरिता काळ ठरला असून अपघातातही वाढ झाली आहे. कामाचे वारंवार सुधारित दराने अंदाजपत्रक तयार करणे, जवळच्या एजन्सीला त्यानुसार कामे देणे, नंतर त्याच एजन्सीकडून काम परवडत नसल्याची बोंबाबोंब करणे त्यातूनच खोटे व बनावट देयक काढणे, असा सावळागोंधळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी चालविला.

या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनीसह सामाजिक संघटना व नागरिकांनी निवेदणने दिली, धरणे आंदोलने केली. विविध कार्यालयांवर मोर्चाही काढला; पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे या महामार्गाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

या बांधकामात बनावट देयकाच्या आधारे 18 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती खुद्द महामार्गाच्या एका अधिकाऱ्यानेच  दिली आहे. यासंदर्भात पुराव्यानिशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी गोपनीय चौकशीही करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमध्येच आपसी वाद-विवाद असल्याने या कामांतील सर्व गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे. सखोल चौकशी झाल्यास अनेक अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांकडून तक्रारीला केराची टोपली

या महामार्गाचे सुरवातीला खोदकाम करून ठेवले आणि अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सिमेंटीकरणापर्यंतचे देयक देऊन मोकळे झाले. चार वर्षांचा कार्यकाळ होऊनही काम पूर्ण झाले नसल्याने या कामातील 18 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी तळेगाव, आष्टी, वर्धमनेरी, आर्वी येथील नागरिकांनी वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली; पण या भ्रष्टाचारात लुप्त असलेल्या अधिकाऱ्यांनी तक्रारींना केराची टोपलीच दाखविली.

माहिती अधिकारालाही दाखविल्या वाकुल्या

या राष्ट्रीय महामार्गांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने अनेकांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचा प्रयत्न केला. परंतु येथील अधिकाऱ्यांनी माहितीच उपलब्ध करून न देता एकमेकांकडे बोट दाखविण्याचेच काम केले. नागपूरचे उपविभागीय अभियंता टाके यांच्याकडे या महामार्गाची जबाबदारी असल्याने त्यांना या महामार्गाच्या खर्चाची माहिती मागितली असता आता हा महामार्ग आमच्याकडून दुसऱ्या विभागाकडे गेला. त्या विभागाचे अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधा, असे सांगितले. जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही. यामुळे या महामार्गासंबंधित अधिकारी किती कर्तव्यतत्पर आहेत, हे या प्रकारांवरून दिसून येत आहे. त्यामुळे या महामार्गाचा वाली कोण, असा प्रश्न आहे.