नागपूर (Nagpur) : खापरखेड़ा स्थानिक वीज केंद्रात आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य देऊन स्थानिक प्रशिक्षित कंत्राटदाराकडून कामे करवून घेतली जातात. मात्र, केवळ मर्जीतील कंत्राटदारांनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक कंत्राटदारांना इन्क्वायरी आणि कोटेशनची कामे देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अन्यथा उपोषणाचा इशाराही दिला आहे.
खापरखेडा येथे दोन मोठी औष्णिक वीज केंद्र आहेत. आवश्यक असलेल्या कामासाठी ई-टेंडर प्रक्रियेत वेळ लागत असल्यामुळे खापरखेडा वीज केंद्रात असलेल्या विविध विभागात आवश्यक कामांना प्राधान्य देऊन 3 लाख रुपयांपर्यंतची इन्क्वायरी कोटेशनची कामे स्थानिक प्रशिक्षित कंत्राटदाराकडून केली जातात. खापरखेडा परिसरात 80% प्रशिक्षित स्थानिक कंत्राटदार आहेत. त्यामूळे त्यांना कामे मिळणे अपेक्षित असताना मर्जीतील व बाहेरच्या कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत.
राजकीय नेत्यांच्या दबावाखाली मर्जीतील व बाहेरच्या कंत्राटदारांना कामे देण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, गरजू व प्रशिक्षित कंत्राटदारांना कामे तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी मुख्य अभियंता विलास मोटघरे यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कपिल वानखेडे, शहर अध्यक्ष रामू बसुले राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष साबीर मिर्जा, महासचिव राजिक पठाण, पंकज मधूमटके, स्वप्नील कावळे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.