नागपूर (Nagpur) : वाढत्या इंधन दरवाढीसोबत पेट्रोलपंपवरून मापात इंधन न मिळणे, कंपनी, उद्योगाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यातील चोरी करून ऑईलची भेसळ करण्यासारखेही प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, खाण व्यावसायिकही त्रस्त आहे. परंतु आता शहरातील दोन सिव्हिल इंजिनिअरिंग केलेल्या तरुणांनी यावर आळा घालण्यासाठी ‘बूस्टर डिझेल’ ही संकल्पना व संयंत्र तयार केले आहे. यातून मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज असलेल्या खरेदीदारांना पूर्ण मापात, दर्जेदार डिझेल त्यांच्या आवश्यकतेच्या जागेवर अर्थात दारावर मिळणार आहे.
उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, खाण मालकांना विविध यंत्रसामुग्रीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करावे लागते. अनेकदा हे डिझेल पंपवरून ड्रममध्ये किंवा कॅनमध्ये भरले जाते. अलिकडच्या काळात पेट्रोलपंपवरून लिटरमागे दहा टक्के चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. याशिवाय कॅन किंवा ड्रमला गळतीचेही प्रकार होतात. तसेच ते धोकादायक असल्याचे अनेक घटनांतून पुढे आले. नेमकी ही बाब हेरून शहरातील नचिकेत पांडे व महेंद्र निलावर या दोन तरुणांनी चोरी, गळतीसह अनेक धोके टाळण्यासाठी ‘बूस्टर डिझेल’ नावाचे सयंत्र तयार केले आहे.
डिझेलची चोरीतून केवळ व्यावसायिक, उद्योजकांनाच फटका बसतो असे नाही, तर उत्पादनाचे दरही वाढून महागाईला पोषक वातावरण तयार होते, ही मोठी समस्या असून त्यावर मात करून एका सामाजिक समस्येलाही आळा घालता येईल, असेही पांडे म्हणाले. सध्या विविध कंपन्या, कोळसा, मॅगनिज खाण, बांधकाम व्यावसायिकांकडे ट्रक इत्यादी वाहने तसेच डिझेलवर चालणाऱ्या विविध मशीन्स असतात. याशिवाय डिझेल जनरेटर चालविणारे व्यावसायिक, हॉटेल, मॉल्समध्येही डिझेलची गरज पडते. या सर्वांना ॲपवर नोंदणी केल्यास सहज अल्पावधीत योग्य मापात व भेसळ नसलेले डिझेल उपलब्ध होणार आहे. या दोन्ही तरुणांनी सध्या भारत पेट्रोलियम कंपनीसोबत व्यवहार सुरू केला आहे. त्यामुळे भारत पेट्रोलियमचे डिझेल दारावर मिळणार आहे. ४० लिटरपासून दोन हजार लिटरपर्यंत सहज मिळणार आहे. एखाद्या ग्राहक दररोज २ हजार लिटर डिझेल खरेदी करीत असेल तर त्याला दहा टक्के अर्थात दोनशे लिटरचे नुकसान सोसावे लागते. सद्यस्थितीत डिझेलचे दर १०३ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळे संबंधित उद्योजक, व्यावसायिक ग्राहकाचे दररोज २० हजारांचे तर महिन्याला सहा लाखांचे नुकसान होत आहे. बूस्टर डिझेलमुळे सहा लाखांची बचत होणार आहे.
पेट्रोलपंपवरून ड्रम, कॅनमध्ये डिझेल भरून दिले जाते. यात अनेकदा फसवणूक होते. याशिवाय ड्रम, कॅन घेऊन जाणारा व्यक्ती त्यातील डिझेल चोरी करून काहीतरी ऑईल त्यात भरून कंपनीपर्यंत पोहोचविण्याचेही अनेक प्रकार घडले आहे. यातून संबंधित कंपनी, उद्योजक, व्यावसायिकांचे नुकसान होते. हे नुकसान ते सामान्य नागरिकांकडून वसूल करतात. हा सर्व प्रकार पाहता बूस्टर डिझेलची संकल्पना पुढे आली.
- नचिकेत पांडे