नागपूर (Nagpur) : सरकारने जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांस मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शूज, मोजे हे सर्वच साहित्य दिले जाते. जिपच्या शाळेत बहुतांश गरीब घरातील मुले येतात. अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शुज, मोजे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे हे साहित्य पुरवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. यासाठी 4.73 कोटी निधीची आवश्यकता आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिपच्या 1518 वर शाळा आहेत. या ठिकाणी सुमारे 73 हजार 941 विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षण घेतात. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता 1 ते 8 मध्ये शिक्षण घेणाऱ्या एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील मुलांसह सर्व मुलींना मोफत गणेश दिला जातो. परंतु ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जिप च्या सेसफंडातील रकमेतून गणवेश उपलब्ध करून देतात. परंतु अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ नसल्याने ते शाळेसाठी आवश्यक असलेले शूज, मोजे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते चप्पल किंवा अणवानी पायानेही शाळेमध्ये येतात.
हेच लक्षात घेता फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत हे साहित्य पुरवण्याचा ठराव घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) नावीन्यपूर्ण योजनेतून किंवा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून ही खरेदी व्हावी, असे ठरले आहे. समितीच्या ठरावानुसार शिक्षण विभागाने निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार प्रतिविद्यार्थी शुजकरिता अंदाजे 558.80 रुपये तर मोज्यांकरिता 41 रुपये लागणार आहेत. या दोन्ही साहित्यासाठी 4 कोटी 73 लाख 81 हजार 395 रुपयांचा निधीची गरज भासणार आहे. हा निधी मिळण्यासाठी डीपीसीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला.