नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात आठशेहून अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा कार्यभार अन्य कर्मचाऱ्यांकडे सोपविल्याने कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. काम वाढल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फजीती होत असल्याच दिसून येत आहे. एकाच कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या विभागाचे काम पाहावे लागते, अश्यात कर्मचारी कार्यालयात आलेल्या लोकांवर आपला कामाचा वाढलेला ताण काढतो. २०१६ नंतर जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया झाली नाही. सरकारने रिक्त पदे भरण्याचे अध्यादेश जारी केल्यानंतर अलीकडेच भरती प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अध्यादेशानुसार आरोग्य विभागातील १०० टक्के आणि इतर विभागातील ८० टक्के पदे भरण्यात येणार आहेत.
निवडणूक आचारसंहितेमुळे झाला विलंब
राज्य सरकारने डिसेंबरमध्ये रिक्त पदे भरण्याचा अध्यादेश काढला. त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. संपूर्ण सरकारी कर्मचारी अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त झाल्याने भरती प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता सुरु झाली. या वेळी भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने विलंब झाला. पण आता रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्हा परिषदमध्ये सरकारकडे आराखडा पाठविला
वर्ग III आणि IV च्या ८०० रिक्त पदांचा अंतिम मसुदा सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारने वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी दिली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी नाही. वर्ग III च्या जागा भरण्यासाठी टीसीएस कन्सल्टन्सीशी सोबत चर्चा सुरू आहे. भरती प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल. कन्सल्टन्सीच्या समन्वयाने महिनाभरात भरती प्रक्रिया सुरू करण्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी दिली.