नागपूर (Nagpur) : महिला उद्योजक निर्माण करणे, बचत गटांना उद्योगाचे स्थान, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, महिला उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासोबत महिलांच्या मनगटाला उद्योगाची साथ देण्याचा मानस जिल्हा परिषदेचा (Nagpur ZP) आहे. त्याकरता महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजार पेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरस प्रदर्शनीसह महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
३ ते ५ जून या कालावधीत मानकापूर क्रीडा मैदान येथे मेळावा होणार आहे. मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. अनुजा सुनील केदार या प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. तसेच, हर्षल चंदा, वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक हे व्यवसाय व मार्केटिंग या विषयावर, शैलेश मालपरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (झलकारी बाई महिला किसान उत्पादन कंपनी) हे उत्पादक कंपनीची स्थापना व विकास या विषयावर मार्गदर्शन करतील.
केरळ राज्यातील प्रसिद्ध संस्था 'कुटुंबश्री'चे तज्ज्ञ प्रशिक्षकही या वेळी प्रशिक्षण देणार आहेत. तर गणेश शिंदे व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन करतील. प्रदर्शनीमध्ये नागपूर विभागातील १५० स्टॉल लावण्यात येणार असून, महिला बाल कल्याण विभागाकडून ५ स्टॉल, आरोग्य विभागाकडून १० स्टॉल व कृषी विभागातर्फे १० स्टॉल लावण्यात येणार आहेत.