नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्या करताना विद्यार्थी हित जोपासण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या. परंतु त्यांच्या ठिकाणी दुसरे शिक्षक देण्यात आलेले नाही जवळपास 78 शाळांमध्ये अशी स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांशिवाय शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात जिपच्या 1 हजार 515 शाळा असून, येथे सुमारे 72 हजारावर विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्याथ्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही जिल्हा परिषद व शिक्षकांची जबाबदारी आहे. परंतु विद्याथ्यांचे हितच जोपासले जात नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच 900 वर शिक्षकांच्या बदल्या झाल्या. बदल्या करताना शाळांमधील विद्यार्थी शिक्षक संख्या लक्षात घेण्यात आली नाही. जेवढे शिक्षक शाळेतून निघाले तेवढेच शिक्षक बदलीने देणे क्रमप्राप्त होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षकच नाही तर काहींमध्ये एक, दोन शिक्षकच आहेत. यात नरखेड, मौदा, कुहीतील सर्वाधिक शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकूच नये का, असाच सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
शाळेत शिक्षकच नसणे हे फार दुर्दैवी आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू आहे. शिक्षण समिती सभापतींचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही. शिक्षण समितीमध्ये यावर जाब विचारू. अशी माहिती दुधाराम सव्वालाखे शिक्षण समिती चे सदस्य यांनी दिली. बदल्यांचे नियोजन चुकले, सत्ताधारी व प्रशासनाला विद्यार्थ्यांची चिंता नाही. हे यातून स्पष्ट होण्याचे मत विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांनी मांडले.
या शाळांचे समावेश
नागपूर ग्रामीण तालुक्यातील 1, हिंगण्यातील 2, नरखेडमधील 12, काटोल 7, कळमेश्वर 2, सावनेर 7, पारशिवनी 3, रामटेक 9, मौदा 13, कुही 12, उमरेड 6 आणि भिवापूरच्या 4 शाळांचा यात समावेश आहे. या 78 शाळामध्ये 161 वर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु त्यापैकी केवळ 4 पदे भरली गेली असून 157 पदे रिक्त आहेत.
46 शिक्षक आले
आंतरजिल्हा बदलीने 2022 मध्ये नागपूर जि.प.मध्ये 228 शिक्षक येणार होते. त्यापैकी सुमारे 46 शिक्षकांना त्यांच्या स्थानिक प्रशासनाकडून कार्यमुक्त केले नसल्याने ते येथे रुजू होऊ शकले नव्हते. अशा 46 शिक्षकांचे 1 जून रोजी समुपदेशन करण्यात आले. या शिक्षकांना ज्या ठिकाणी शिक्षकच नाही. अशा ठिकाणी पदस्थापना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.