Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur ZP : मोबदला मिळाल्यावरच महामेट्रोला मिळणार विस्तारीकरणासाठी जागा 

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मेट्रो (Nagpur Metro) रेल्वेकडून हिंगणा तालुक्यातील रायपूरमधील 3500 चौरस मीटर जागेची मागणी करण्यात आली आहे. मोबदला मिळाल्यावरच ही जागा मेट्रो रेल्वेला देण्याचा ठराव जिल्हा परिषदेने (ZP) घेतला आहे.

जि. प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती राजू कुसुंबे, प्रवीण जोध, मिलिंद सुटे, व्यंकटेश कारेमोरे, संजय झाडे, रश्मी बर्वे, नाना कंभाले, दिनेश बंग, तापेश्वर वैद्य व अधिकारी उपस्थित होते.

मेट्रो रेल्वेचे विस्तारीकरण होणार आहे. यासाठी रायपूर येथील साडेतीन हजार चौरस फूट जागा देण्यासाठी महामेट्रोच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हा परिषदेला पत्र पाठविण्यात आले आहे.

प्रशासनाकडून याबाबतची माहिती स्थायी समितीत ठेवली. कंभाले यांनी विरोध दर्शविला. जागेसाठी मोबदला मिळायला पाहिजे. रेडीरेकनरच्या दराने हा मोबदला दिला पाहिजे. यातून जिल्हा परिषदेला उत्पन्न होणार असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. त्याला इतर सदस्यांनीही समर्थन दिले.

रेडीरेकनरच्या आधारे मोबादला मिळाल्याशिवाय जागा न देण्याचा ठराव घेण्यात आला. जागेसाठी मेट्रोच्या कार्यकारी अभियंत्यानी पत्र पाठवले. जागा संपादनाची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हा प्रस्ताव येणे अपेक्षित असल्याचेही कंभाले म्हणाले.

कोकड्डे व झाडेत झाली चकमक

कर्मचाऱ्यांची सेवा संलग्न करण्याच्या मुद्यावरून अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व शिवसेना सदस्य संजय झाडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मागील सभेत माहिती मागितल्यावर ती न दिल्याने झाडे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर याबाबतची यादी देण्यात आली. 34 कर्मचाऱ्यांची सेवा सलग्न झाली. काही कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाकडून लपवण्यात आली.

अताशा आशीर्वाद बिल्डर्स ब्लॅक लिस्ट

धानला येथील आरोग्य उपकेंद्राचे काम अताशा आशीर्वाद बिल्डर्सला देण्यात आले. 18 महिन्यात काम पूर्ण करायचे होते. परंतु 6 वर्षाचा काळ होत असताना अद्याप इमारत पूर्ण झाली नाही. शिवाय कामाचा दर्जाही योग्य नाही. त्यामुळे या बिल्डर्सचा करार रद्द करून त्याला ब्लॅक लिस्ट (काळ्या यादीत) टाकण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अध्यक्षा कोकड्डे यांनी दिले.