Nagpur ZP Tendernama
विदर्भ

कंत्राटदारासाठी पदाधिकारीच भिडले; ‘खेळणी’ खरेदीसाठी एवढे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळणीचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी पावणे तीन कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया राबवून साहित्य खरेदी केले जाणार आहे. मात्र दरावरून घोडे अडले आहे. यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. मात्र दरापेक्षा कंत्राटार आपला असावा यासाठी शिक्षण समितीचे पदाधिकारी आपसात भिडले असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेच्या १५०० वर शाळा आहेत. यातील ३०० वर शाळांमध्ये हे साहित्य देण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमध्येच हे साहित्य लावायचे आहे. परंतु काहींकडून मतदार संघातीलच शाळांची निवड करण्यासाठी आग्रह होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शिक्षण समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार समितीत खरेदीवर जोर होता. साहित्याच्या गुणवत्तेवर चर्चा झाली नाही. अनेक उद्यान व सार्वजनिक ठिकाणी खेळणी साहित्य लावण्यात आले आहे. परंतु त्यांचा दर्जा योग्य नसून लवकरच ते मोडळीस येत असल्याच्या तक्रारी आहे. परंतु गुणवत्तेबाबत पदाधिकारी, अधिकारी फारसे गंभीर नसल्याचे दिसते. येत्या दीड महिन्यात विद्यमान पदाधिकारी व समिती सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी हा विषय मार्गी लावण्यासाठी ‘लगीन घाई’ होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व साहित्य फायबरचे असणार आहे. पहिल्या टप्प्यात यावरच चर्चा झाली. अंतिम निर्णय व्हायचा आहे. साहित्याची यादी अंतिम व्हायची असताना कंत्राटदारांची शोधशोध सुरू झाली आहे. काही जणांनी संबंधितांशी संपर्कही साधल्याचे सांगण्यात येते. साहित्याचे दरही निश्चित करण्यात येत आहेत. परंतु याला काही सदस्यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. यावरून काही पदाधिकारी व सदस्यांमधील मतभेदही वरिष्ठांसमक्ष समोर आल्याचे सांगण्यात येते.