नागपूर (Nagpur) : पंचायत राज समिती (PRC) नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) दाखल झाली असून, तब्बल २१ आमदारांमार्फत जिल्हा परिषदेच्या (Jilla Parishad) कारभाराची झाडाझडती सुरू झाली आहे. आमदारांची बडदास्त राखण्यासाठी बांधकाम विभागासह, पंचायत व शिक्षण विभागावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंचायत राज समितीमध्ये एकूण ३२ आमदारांचा समावेश आहे. पीआरसीला खुश ठेवण्यासाठी पाच कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट देण्यात आले. त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक शिक्षकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये गोळा केले जात आहे. एका शिक्षकावरच याची जबाबदारी सोपविली आहे. संबंधित शिक्षकानेच नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती 'टेंडरनामा'ला दिली.
जिल्हा परिषदेत सुमारे तीन हजाराच्या जवळपास शिक्षक आहेत. प्रत्येकाकडून पाच हजार आल्यास दीड कोटी रुपयांचा निधी जमा होतो. मात्र अनेक शाळा दुर्गम भागात आहेत. सध्या शाळांना सुटी आहे. तीन हजार शिक्षकांना गाठणे आणि त्याच्याकडून पाच रुपये आणणे हे अवघड असल्याचे संबंधित शिक्षकाने सांगितले.
वर्ष २०१६ ते २०१८ या काळातील आक्षेपांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती पीआरसीकडून घेण्यात येणार आहे. समिती येणार असल्याने आठ दिवसापासून संपूर्ण जिल्हा परिषद मिशन मोडवर आहे. सीईओंनी तक्रारींच्या अनुषंगाने विभागप्रमुखांच्या बैठका घेतल्या. परंतु पीआरसीकडून होणाऱ्या कारवाईची धास्तीच सर्वच विभागाने घेतली आहे. समितीच्या दौऱ्यावर मोठा खर्च येणार आहे. हा खर्च कोट्यवधींच्या घरात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी निधीची जुळवाजुवळ करण्यात येत आहे. काही विभागांकडून ती पूर्ण झाली असून काहींनी मात्र हात वर केल्याचे सांगण्यात येते.
समितीवरील खर्चाने अनेकाचे डोळे विस्फरले आहे. खर्चाची मोठी जबाबदारी बांधकाम, पंचायत व शिक्षण विभागावर असल्याचे सांगण्यात येते. इतर विभागावर कामावर लागले आहे. यासाठी काही अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली. याला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. परंतु काही अधिकाऱ्यांनी खर्च ‘कामकाजाचा भाग’ असल्याचे सांगत समर्थन केल्याचे सूत्रांकडून खासगीत सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार पीआरशीसंबंधित सचिवांनी आज एका शासकीय निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यांच्याकडून माहिती घेतली. त्याच प्रमाणे समितीच्या कार्यकक्षेची माहिती देत त्रुटी गंभीर असल्यास भविष्यातील कारवाईचा इशारा देत त्यांच्या पूर्तेतेसाठी आवश्यक जुळवाजुळव करण्याचेही सांगितल्याची चर्चा आहे.