नागपूर (Nagpur) : कोरोनाच्या ‘लाटेवर' स्वार होत अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी अंदाधुंद खरेदी करून लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत. त्यात आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा समावेश झाला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून मुदत संपलेल्या औषधांच्या किट व साहित्य खरेदी करून त्यांचे तडकाफडकी वितरण करण्यात आले. यात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप राधा अग्रवाल यांनी केल्यानंतर वित्त सभापती भारती पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले.
वित्त समितीची बैठक सभापती भारती पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली. त्यात विरोधी सदस्या राधा अग्रवाल यांनी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कोरोना किट ग्रामपंचायतस्तरावर खरेदी केली. परंतु, खरेदी करताना अल्प मुदतीची खरेदी केलेली औषध कमी कालावधीत वितरित करावी लागली. विशेष म्हणजे गत महिन्यात खरेदी केलेली औषध ४-५ जून रोजी काही पीएचसीला मिळाल्या. त्यातही अनेक पीएचसी यातून सुटल्याचा आरोप त्यांनी बैठकीत केला. शिवाय औषधांबाबत ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्याला कल्पना नव्हती. याबाबत माहिती काढल्यानंतर घबाड चव्हाट्यावर आल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व खरेदी सुमारे २५ लाखांच्या घरात आहे. औषधांमध्ये सॅनिटायझर, सोडियम फ्लोरोक्साईड, ट्रिपल लेअर मास्क, हॅण्ड ग्लोज ही औषधे अल्प मुदतीची का खरेदी करावी लागली? शिवाय वितरित करण्यास गुप्तता का पाळण्यात येत आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. यावर आरोग्य विभागाचे अधिकारी निरुत्तर ठरल्याने वित्त सभापती भारती पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले.
कार्यकाळ संपत असल्याने पदाधिकाऱ्यांचा जोर आहे. पंधराव्या वित्त आयोगातून खरेदी करण्यात आलेले औषधांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला. याची चौकशी झाली पाहिजे.
- राधा अग्रवाल, सदस्य, वित्त समिती