नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेत (ZP) नियमबाह्य व जवळ कुठलेही साहित्य नसताना कामे करणाऱ्या कंत्राटदारांची (Contractor) संख्या वाढली आहे. अशा कंत्राटदारांना काही विभागप्रमुखांकडून प्रोत्साहन देण्यात येत असून, काहींसाठी ते एजंट सारखे काम असल्याची चर्चा आहे. यामुळे काही अधिकारी, कर्मचारी त्रस्त आहे. त्यांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
वर्षभरापूर्वी नानक कन्स्ट्रक्शनने कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली होती. त्याच्याकडे आवश्यक साहित्यही नसल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही बांधकाम, लघुसिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची कामे मिळवली. एका घोटाळ्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेने त्याला काळ्या यादीत टाकले होते. या प्रकरणाची सुनावणी ग्रामविकास खात्याकडे चालली. त्यात त्याला क्लीनचिट मिळाली. परंतु, यामध्ये प्रशासनासमोरची डोकेदुखी वाढून कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती.
मागील काळात सचिन नामक कंत्राटदारांची अशीच पकड होती. त्याचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याने तगडे कमिशन देऊन कामे करीत असल्याची चर्चा होती. आता 'गणेश'ची चर्चा आहे. बांधकाम विभाग, लघुसिंचन, पाणी पुरवठा बांधकाम व शिक्षण विभागात त्याची मोठी चलती असल्याचे सांगण्यात येते. काही पदाधिकाऱ्यांच्या गळ्यातील 'ताईत' असल्याचे बोलल्या जाते.
बांधकामाचे टेंडर घेताना काम करण्यासाठी मशिनरी व इतर साहित्य असणे आवश्यक आहे. त्याशिवाय, टेंडर प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. परंतु, काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व कार्यक्रमच त्याने फिक्स केल्याची चर्चा आहे. जुन्या इमारतीमधील एका विभागातील अधिकाऱ्यासाठी तो एजंट सारखा काम करीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. या प्रकारामुळे काही अधिकारी व कर्मचारी त्रस्त असू अशांवर अंकुश लावण्याची मागणी होत आहे.