Vidarbh, Road Tendernama
विदर्भ

Nagpur : विदर्भातील रस्त्यांची का लागली वाट? दुरुस्तीही थांबली, जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : संपूर्ण विदर्भात मागील 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांचे हाल बेहाल झाले आहेत. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. अशात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला शासनाकडून निधीच आलेला नाही. सेस फंडातून रस्त्यांची दुरुस्ती शक्यच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे असून लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

अतिवृष्टी व पुरामुळे पुन्हा रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून शासनाकडे 300 कोटींची मागणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची लांबी 8 हजार 91 किलोमीटर आहे. मागील काही वर्षात पावसाळ्यात सलग अतिवृष्टीचा फटका बसला. रस्त्यांची दुर्दशा झाली. डागडुजी करण्याचे काम जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागामार्फत केल्या जाते. मागील सात वर्षांत 644 कोटी 58 लाखांची मागणी शासनाकडे केली परंतु रस्ते दुरुस्तीचा निधीच आला नाही.

ऑक्टोबर 2023 मध्ये 300 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 152 कोटींची मागणी शासनाकडे केली होती. परंतु छदामही मिळाला नाही. दुसरीकडे आमदारांच्या आग्रहामुळे पाणंद रस्त्यांसाठी मात्र 86 कोटी मिळाले. रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामीणमधील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. अनेक गावांतील एसटी बससेवा बंद आहे.

मागील तीन-चार वर्षांतील अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पूल वाहून गेले होते. काही गावातील रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. मागील दोन वर्षांचाच विचार करता रस्ते दुरुस्तीसाठी दोन वर्षात 290 कोटींची मागणी केली असताना फक्त 10 कोटीच मिळाला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र जोराचा पाऊस झाल्याने नादुरुस्त रस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग, पुलांचे दरवर्षी मोठे नुकसान होते. मात्र शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने ग्रामीण भागातील जि. प.च्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.