Nagpur ZP Tendernama
विदर्भ

Nagpur : आचारसंहितेचे उल्लंघन करत नियमबाह्य काढलेले टेंडर अद्याप रद्द का केले नाही?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : डिजिटल शाळेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जेम पोर्टलवर अपलोड केलेल्या टेंडरवरून (Tender) वाद निर्माण झाला होता. जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडे यांनी चौकशीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना दिल्यानंतर शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर कळुसे यांनी हे टेंडर रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्याप ते रद्द करण्यात आले नसल्याची माहिती आहे.

7 कोटी 3 लाख रुपये खर्चून 200 शाळा डिजिटल केल्या जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात यासाठी 15 ते 20 टक्के निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. हे साहित्य खरेदी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जेम पोर्टलवर टेंडर अपलोड करण्यात आले.

आचारसंहिता शनिवार 16 मार्चला लागली. त्याच दिवशी हे टेंडर अपलोड करण्यात आले. अचारसंहितेचा भंग झाल्यामुळे या प्रकरणी चौकशीच्या मागणीचे पत्र कोकडे यांनी सीईओंना दिले होते. टेंडरमध्ये भाग घेण्यासाठी निश्चित करण्यात आलेली मुदत संपली असून यात 5 ते 8 जणांनी भाग घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

हे टेंडर अद्याप खुले करण्यात आले नसल्याचेही समोर आले आहे. परंतु टेंडर रद्द करण्यात आलेली नाही. 120 दिवसात कार्यादेश देता येणार असल्याची माहिती आहे. आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आताच त्यावर काहीही भाष्य करता येणार नाही. नियमानुसार प्रक्रिया सुरू आहे, अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांनी दिली.