Ambazari Lake Tendernama
विदर्भ

Nagpur : पुलाच्या बांधकामाऐवजी भलत्याच कामांना प्राधान्य कशासाठी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नागपूरला आलेल्या पुराला आता सहा महिने उलटून गेले आहेत. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली केल्या जात आहेत, पण प्राधान्य कशाला द्यावे, हा संभ्रम दिसून येतो.

सध्या बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे; पण तज्ज्ञांच्या मते पुरासोबत बंधाऱ्याचा संबंध नाही. त्यापेक्षा विवेकानंद स्मारकासमोर रस्त्याखालचा पूल मोठा करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे धरणापासून प्रवाहाच्या उगमस्थानी नाल्यात गाळ, कचरा साचला असताना त्याकडे दुर्लक्ष करून भलतीकडे सफाईकामे केली जात आहेत. 

पाणथळ जमिनीच्या 100 मीटरच्या परिसरात बांधकामाला परवानगी देता येत नाही. मात्र, आधी क्रेझी कैसल व नंतर विवेकानंद स्मारक बांधण्याला मंजुरी दिली, जे संकटाचे कारण ठरले आहे. यापुढे मेट्रोचा पूल व स्टेशनला मंजुरी देणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाद्वारे होणारे प्रयत्न आंधळा दळतो, कुत्रा पीठ खातो' या उक्तीप्रमाणे कोट्यवधी खर्च करून नुकसानकारक ठरणारे असल्याची टीका होत आहे. स्थानिक नागरिकांशी चर्चा करताना सिंचन विभागाचे माजी सचिव सुभाष देशपांडे यांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मेट्रोचे भविष्यातील संकट टाळणे

केवळ प्रवाशांना तलावाचे दृश्य दिसावे म्हणून पाणथळ जमीन असूनही मेट्रोच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या पुलावरून दररोज धावणाऱ्या मेट्रोच्या धक्क्यामुळे बंधाऱ्याला हादरे बसणे साहजिक बाब आहे. शिवाय पाणथळ जागेवर मेट्रोच्या पिलरला भविष्यात धोका पोहोचण्याची शक्यता आहे. हे संकट टाळण्यासाठी प्रशासन काय उपाय करणार आहे, असा सवाल एमएसईबीचे निवृत्त अभियंता व रहिवासी यशवंत खोरगडे यांनी केला.

बंधाऱ्याचे मजबुतीकरण, पीचिंगसाठी प्रयत्न :

सिंचन विभागाने अंबाझरी धरणाचे आयुर्मान पूर्ण झाल्याची व मजबुतीकरणाची सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनातर्फे एका कंत्राटदाराच्या माध्यमातून बंधाऱ्याचे रुंदीकरण, मजबुतीकरणाचे काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

पुलाचे काम करणे, क्रेझी कॅसलचे बांधकाम काढणे :

यशवंत खोरगडे यांच्या मते, स्मारकासमोरील पूल अरुंद असून, त्यातून पाण्याचा लोंढा वाहून जाऊ शकत नाही. प्रशासनाने ही बाब मान्यही केली आहे. त्यामुळे आधी या पुलाचे बांधकाम आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत हालचाली दिसून येत नाही. दुसरीकडे, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या क्रेझी कॅसलच्या आडव्या तिडव्या भिती व इतर बांधकाम तोडणे आता अधिक महत्त्वाचे आहे.

ओव्हरफ्लो पॉइंटवर चार गेट : 

ओव्हर फ्लो पॉइंटच्या 100 मीटर पारीला भगदाड पाहून चार गेट करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे 75 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होईल, असे सांगण्यात येते. मात्र, समोर भव्य स्मारक असताना व शेजारच्या दोन कॅनालमधून केवळ 60 क्युसेक्स पाणी वाहून जात असताना हा प्लॅन फारसा उपयोगी पडणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.