नागपूर (Nagpur) : सिमेंट रस्त्याचे जाळे सर्वत्र विणत असताना त्याला भेगा पडून अपघात होण्याचे प्रकारही वाढले आहेत. खापा-सावनेर मार्गावर जागोजागी तडे गेले आहेत. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
सावनेर-खापा या महामार्गावरील सिमेंट रस्त्याला जागोजागी तडे गेले असल्याने सिमेंट रोडला मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भेगा पडलेला रस्ता दुरुस्ती करण्याच्या नावाने गेल्या एक महिन्यापासून खोदून ठेवला आहे. एक महिना लोटला, परंतु अजूनही रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली नाही. याचा त्रास वाहनचालकास सहन करावा लागत आहे.
वळण मार्गावरील हा रस्ता धोकादायक असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खापा-सावनेर महामार्गावरील कोदेगाव नजीकच्या गुरुजी पेट्रोल पंपाजवळ सिमेंट रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. रस्ता दुरुस्ती करिता गेल्या एक महिन्यापासून खोदकाम करण्यात आले. मात्र, अद्याप रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नाही. वळण रस्ता असल्याने अपघाताची शक्यताही बळावली आहे. एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दुरुस्ती करिता रस्ता खोदून तसाच ठेवण्यात आला आहे. हा भाग दोन वळणांमध्ये असल्याने या भागात अनेक अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एचजी इन्फ्रा कंपनीने बांधकाम केलेल्या या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारीही कंपनीची आहे. परंतु, एचजी इन्फ्रा कंपनीने दुरुस्तीचे काम अपूर्ण ठेवल्याने अनेकदा लोक अपघाताचे बळी ठरत आहेत.
मागील वर्षी याच महामार्गाच्या दुरुस्तीच्या वेळी एका दुचाकीस्वाराला दहाचाकी ट्रकने चिरडले होते. अशा घटना परिसरात पुन्हा घडू नयेत, यासाठी गेल्या एक महिन्यापासून प्रलंबित असलेले रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सिमेंट रस्त्यामुळे अपघाताचा धोका
गावखेड्यापासून तर सर्वत्र सिमेंट रस्ते तयार करण्यात येत आहे. या रस्त्यावर आता भेगा पडू लागल्या आहेत. या भेगा बांधकाम विभागाकडून बुजविल्या जात नाही. त्यामुळे दुचाकी वाहन स्लीप होऊन अपघात होत आहे. यापूर्वी लहानसहान अनेक अपघात झाले. याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.