Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur: 13 कोटींच्या ग्रीन जिम टेंडरला स्थानिक नेत्यांचा विरोध का?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत जिल्ह्यातील 200 गावांमध्ये ग्रीन जिम (Green Gym) लावण्यात येणार आहे. यासाठी 13 कोटींचे एकच टेंडर (Tender) काढण्यात आले असून, जिल्हा परिषदेच्या इतिहासातील सर्वांत मोठे टेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. या निधीतून खाण बाधित क्षेत्रात कामे करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून, ग्रीन जिमचे काम निकषाच्या बाहेरील असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हे काम वादात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी यांनी 24 जून 2022 मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत याचे काम करण्याचे आदेश दिले. रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, जिल्हा परिषद मौदा, नागपूर ग्रामीण, पारशिवनी, सावनेर, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील 200 गावांत जिमचे साहित्य लावण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून 13 कोटींची एकमेव टेंडर प्रसिद्ध करण्यात आली. मे. फ्रेण्डस् स्पोर्ट नामक कंपनीची टेंडर कमी असल्याने ती स्वीकारण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या टेंडरला मान्यताही देण्यात आली.

नागपूर जिल्ह्यातील 10 ते 12 गावांमध्ये 13 कोटी रुपये खर्च करून ग्रीन जिम लावण्याचा घाट घातला जात आहे. या विषयावरून जिल्हा परिषदेचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. गावांमध्ये ग्रीन जिम बसवण्याचे काम ‘कौशल्य विकास’अंतर्गत येत नाही, असे कॉंग्रेसचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव यांचे स्पष्ट म्हणणे आहे.

सोबतच त्यांनी ग्रीन जिम वर खर्च होणारे 13 कोटी आरोग्य सेवेवर म्हणजेच सर्वसुविधायुक्त दवाखाण्यावर खर्च करावी, अथवा गरिबांसाठी उत्तम दर्ज्याची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढण्याची मागणी यादव यांनी केली आहे.

नियमबाह्य 13 कोटी रुपयाच्या प्रस्तावास तात्काळ नामंजूर करून, प्रथम प्राधान्य क्रमाने प्राप्त प्रथम प्रत्यक्षबाधित गावातील विकास कामांना मंजूरी द्यावी, अशी मागणी गज्जू यादव यांनी केली आहे.

निकषाच्या बाहेरील काम?

केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य शासनानेही खनिज निधीतून करण्यात येणाऱ्या कामाबाबत काही निकष निश्चित केले आहेत. पाणी, पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यासह इतर काही बाबींवर खर्च करता येतो. ग्रीन जिमचा या निकषात समावेश नसल्याचे सांगण्यात येते. या ग्रीन जिमचा प्रत्यक्ष लाभ बाधित क्षेत्रातील नागरिकांना नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. रस्ते, आरोग्य, शिक्षण यासंदर्भात खर्च करणे क्रमप्राप्त होते. परंतु ग्रीन जीमवर एवढा मोठा निधी खर्च करण्यात येत असल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात होत आहे.

जिल्हा परिषदेने काढलेल्या टेंडरसाठी चार व्यक्तींनी अर्ज केले होते. यातील एकाचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद करण्यात आला. तर तीन जणांची टेंडर स्वीकृत करण्यात आली. विशेष म्हणजे दोन जणांनी जादा दराची टेंडर सादर केली. तर एकाने कमी दराची टेंडर सादर केली. त्यामुळे तिला मंजुरी देण्यात आली.

कमी दराची टेंडर फक्त 40 हजारांनी कमी असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्याने 13 कोटी 1 लाख 57 हजार 200 रुपये, तर तिसऱ्याने 14 कोटी 12 लाख रुपयांची टेंडर भरली. तर मे. फ्रेण्डस् स्पोर्टची 12 लाख 99 हजार 60 हजारांची टेंडर मंजूर करण्यात आली. एका गावात साधारणतः 6 लाख 47 हजार 800 रुपयांचे ग्रीन जिम लागणार असून त्यात आठ प्रकारचे साहित्य असल्याचे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.