MJP Tendernama
विदर्भ

Nagpur : 2 वर्षांपुर्वीच मंजुरी मिळूनही 48 कोटींची पाणीपुरवठा योजना का रखडली?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : हिंगणा तालुक्यातील निलडोह व डिगडोह या दोन्ही गावाला पाणीपुरवठा करणारी 44 कोटींची योजना मंजूर होऊन दोन वर्षे झाली आहेत. पण, अजूनही ही योजना पूर्ण न झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. या योजनेच्या कामाची गती वाढवावी, या मागणीचे निवेदन डिगडोह जनहित सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिले.

ग्रामपंचायत निलडोह आणि डिगडोहसाठी नवीन 44 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर काम सुरू होऊन दोन वर्षे लोटली तरी सुद्धा ही योजना अद्याप पूर्ण झाली नाही. नागरिकांनी याबाबत स्थानिक आमदार समीर मेघे यांच्याकडे तक्रार केली. यावर त्यांनी सुद्धा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला.

ग्रामपंचायतने सुद्धा वारंवार या कामाबद्दल पाठपुरावा केला. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे ही संयुक्त नळ योजना वेळेवर पूर्ण झाली नाही. याकडे लक्ष देऊन ही योजना तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी केली.

नागरिकांच्या रेट्याची दखल

नागरिकांच्या समस्यांच्या लढ्यासाठी कार्य करणाऱ्या डिगडोह जनहित सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत बुरडे यांना निवेदन दिले. यामागे जनतेचाही रेटा होता. त्यामुळे बुरडे यांनी तातडीने दखल घेतली. बुरडे यांनी स्वतः योजनेच्या कामाची पाहणी केली.