Harpur Stadium Tendernama
विदर्भ

Nagpur: 30 वर्षांपासून धूळ खात पडलेले हे स्टेडियम कधी सुरू होणार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sunshilkumar Shinde) यांनी 2004 मध्ये भूमीपूजन केलेल्या हरपूर स्टेडियमचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा एनआयटीच्या (NIT) अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हे हरपूर स्टेडियम सध्या काळात धूळ खात पडलेले आहे. उपराजधानी नागपूरमधून अनेक मोठे नेते होऊन गेले आणि आता सुद्धा राज्यात आणि केंद्रात नागपुरातील अनेक मोठे नेते सत्तेत आहे. तरी सुद्धा हरपूर स्टेडियमची निधीअभावी अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

विशेष म्हणजे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री दत्ता मेघे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विकास ठाकरे, नितीन राऊत अशा अनेक मोठ्या नेत्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे का दुर्लक्ष केले, ही गोष्ट पचणारी नाही. जर वेळेवर हे स्टेडियम तयार झाले असते तर आतापर्यंत हजारो-लाखो खेळाडू नागपूर जिल्ह्यातून समोर आले असते. एकंदरीत सगळ्याच राजकीय पक्षाने नागपूरच्या या मोठ्या प्रकल्पाकडे दुर्लक्षित केले हे वास्तव आहे.

दक्षिण नागपुरातील उमरेड रोडवरील हरपूर येथील इनडोअर स्टेडियमचे बांधकाम सुरू होऊन 25 ते 26 वर्षे उलटूनही आज ही हे स्टेडिअम अपूर्ण आहे. प्रकल्पाचा खर्च आता पाच पटीने वाढला आहे. सार्वजनिक पैशाचे नुकसान करणे आणि खेळाडूंना वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे झाले आहे.

2019 मध्ये मंडळाने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एनएमआरडीएला 10 कोटी रुपये दिले होते. एनएमआरडीए फिनिश लेव्हलिंग पृष्ठभागाचा थर, बॅडमिंटन, कॅरम क्षेत्र, कंपाऊंड वॉल, स्टॉर्म वॉटर ड्रेन, अंतर्गत रस्ते आदी कामे केली. आता एनएमआरडीएला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 49.56 कोटींची गरज होती. यामुळे प्रकल्पाची एकूण किंमत 66.67 कोटी पेक्षा जास्त झाली आहे, जी सुरवातीच्या खर्चापेक्षा पाच पट अधिक आहे. आता एनआयटीच्या बजेट मध्ये फक्त 10 कोटी निधी घोषित झाल्यामुळे स्टेडियम सुरू होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

जेव्हा सुनील केदार क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री होते तेव्हा त्यांनी 8 ऑगस्ट 2020 आणि सप्टेंबर 2015 या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. 2020 मध्ये एनआयटीला हा प्रकल्प क्रीडा क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते, मात्र असे झाले नाही. सुनील केदार यांच्या निर्देशानंतरही हा प्रकल्प क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी एनएमआरडीएला एनओसी देण्यास मंडळाने विलंब केला.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एनएमआरडीएचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर मंगळवारी नागपुरात नागपूर इम्प्रूवमेंट ट्रस्टचा (एनआयटी) अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. बरखास्तीच्या संकटातून बाहेर आल्यानंतर एनआयटीचे अध्यक्ष मनोजकुमार सूर्यवंशी यांनी मंगळवारी विश्वस्त मंडळासमोर 1213.96 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

या बजेटमध्ये मौजा हरपूर येथे नवीन स्टेडियम बांधण्याची घोषणा करण्यात आली. सिव्हिल लाइन्समधील व्हीसीए आणि जामठा मैदानानंतर हे नवीन स्टेडियम असेल. त्यासाठी अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आता नागपूर जिल्ह्याच्या खेळाडुंना हरपूर स्टेडियम सुरू होण्याची प्रतिक्षा आहे.