Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : फडणवीस, गडकरींच्या शहरातील 'तो' पूल कधी पूर्ण होणार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : उपराजधानी नागपूर शहराचे सुपुत्र नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भलेही एका दिवसात 28 किलोमीटरचा रस्ता बांधत असेल, शहरातील दुसरे सुपुत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याला समृद्धी महामार्गाची (Samruddhi Expressway) भेट दिली. मात्र, दोन्ही सुपुत्रांच्या शहरात एक लहानसा तुटलेला पूल (Bridge) बांधणे कठीण झाले आहे. विद्यापीठ लायब्ररी चौकाजवळ नाग नदीवरील तुटलेला पूल लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. पण त्याहूनही निगरगट्ट अधिकाऱ्यांवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. 

प्रभाग क्रमांक 15, रामदास पेठेतील विद्यापीठ लायब्ररीजवळ नाग नदीवर असलेला हा लहानसा पूल पावसामुळे तुटला होता. पूल तुटताच महापालिकेने तो वाहतुकीसाठी बंद केला. तेव्हा नागपूरकरांना अपेक्षा होती की ज्या शहरात रस्ते बांधकामाचा रेकॉर्ड करणारे नेते राहतात त्या शहरात एवढा लहानसा पूल बांधण्यासाठी असा किती वेळ लागणार आहे. मात्र, नागपूरकरांच्या पदरी निराशाच आली. पूल तुटण्यास वर्षभराहून अधिक काळ झाला असला तरी बांधकाम पूर्ण झालेले नाही. महापालिकेचे प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून याचा फटका मात्र सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी एक फलक लागला आहे. त्यानुसार मे. सनी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. ला 31 ऑक्टोबर 2022 रोजी या पुलाचे काम देण्यात आले. काम पूर्ण करण्यासाठी 12 महिने दिले गेले. या मुदतीचा विचार करता दोन महिन्यांत काम पूर्ण व्हायला हवे. मात्र, प्रत्यक्षात कामाची प्रगती पाहिली असता या मुदतीत काम होण्याची चिन्हे नाहीत.

काही दिवसांपासून बांधकाम बंद आहे. अधिकाऱ्यांना विचारणा केली तर बरीच कारणे देतात. आता तर लोक म्हणू लागले आहेत की ज्या शहरातील अधिकारी एवढे सुस्त असतील ते शहर स्मार्ट कसे होईल. शहरातील नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर या पूलाचे काम करून तो सुरू करण्यात यावा.