नागपूर (Nagpur) : नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा विधानसभा क्षेत्रातील अनेक विकास कामाचे प्रस्ताव नगर विकास विभाग व अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र हे प्रस्ताव अद्यापही प्रशासकीय मान्यतेसाठी धूळखात पडून आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासारख्या महत्त्वाच्या योजना रखडल्या आहेत. शेतकन्यांना वरदान ठरणाऱ्या लखमापूर सिंचन प्रकल्पाचा 40 कोटींचा निधी शासनाकडे रखडला आहे.
डिगडोह, नीलडोह व इसासनी ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन लाखांवर आहे. या तीनही स्थानिक स्वराज्य संस्थांना कचरा टाकण्यासाठी संयुक्त डंपिंग यार्डसाठी किमान दहा एकर जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद नाही.
डिगडोह ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी नगर विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही शासनाकडून झाली नाही. वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात झपाट्याने शहरीकरण झाले आहे. लोकसंख्या जवळपास लाखांवर पोहोचली आहे. या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा 146 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. नगर विकास मंत्रालयाकडे आहे. हा प्रस्ताव मागील दोन वर्षापासून नगर विकास मंत्रालयाकडे धूळखात पडून आहे.
हिंगणा नगरपंचायतीचा भुयारी गटारी योजना करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला निधीची आवश्यकता आहे. नगर विकास मंत्रालयाकडे नवीन डीपी प्लॅन मंजुरीसाठी पाठविला आहे. तीन वर्षाचा कालावधी लोटूनही या डीपी प्लॉनला मंजुरी देण्यात आली नाही. हिंगणा शहराला जोडणारे अंतर्गत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.
डोंगरी टोलनापासून हिंगणा शहरातील पास रिंग रोडपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त कामाची गती संच आहे. वेणा नदीवरील सौंदर्य करणासाठी कोटी 50 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. निधी वेळेवर न मिळाल्यामुळे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. यानंतर निधीचा तुटवडा असल्याचे कारण सांगून सदर काम निधी उपलब्ध होईल, तेव्हा करण्यात येईल असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची 17 कामे प्रस्तावित आहेत. या कामासाठी मागील चार वर्षांत एकदाही निधी सरकारने दिला नाही. आमदारांनी अनेकदा बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मिहान प्रशासन याला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढून न्याय द्यावा, अशी रास्त मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.
नवीन इमारतीच्या जागेचा वाद
हिंगणा नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. मात्र इमारत कुठे उभी करायची, या जागेच्या वादावरून नगरपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने हा निधी शासनाकडे परत गेला आहे. आता नव्याने नगरपंचायतीची टोलेजंग इमारत उभारण्यासाठी निधी मंजूर करणे अपेक्षित आहे.
एम्ससाठी 25 किलोमीटरचा फेरा
जागतिक दर्जाचे एम्स हॉस्पिटल हिंगणा विधानसभा क्षेत्रात आहे. निलडोह, डिगडोह, इसासनी रायपूर, हिंगणा, खडका यासह इतर गावातील जनतेला रुग्णालयात जाण्यासाठी मिहान मार्गे जावे लागते. मात्र मिहान प्रकल्प चालविणाऱ्या यंत्रणेने रुग्णालयात जाणाऱ्या लोकांनाही मिहानमार्गे जाऊ दिले जात नाही. यामुळे 25 किलोमीटरचा फेरा मारून रुग्णांना उपचारासाठी जावे लागत आहे. हिंगणावरून मिहान मार्गपर्यंत गेलेल्या एका रुग्णाला अडविण्यात आले. यामुळे या रुग्णांचा काही दिवसापूर्वी जीवही गेला होता. तरीही मिहान प्रशासन आडमुठी भूमिका घेत आहे.