नागपूर (Nagpur) : विनयशील व्यक्ती आणि समाज घडविण्याच्या उदात्त हेतूने माजी सनदी अधिकारी श्याम तागडे यांच्या पुढाकाराने मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने उमरेड मार्गावरील राजूलवाडीजवळ बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमी साकारली जात आहे.
उमरेड मार्गावर साडे बारा एकरात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रतिष्ठानतर्फे सुरवातीला चार प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती तागडे यांनी दिली. एक हजार उपासकांना एकाचवेळी धम्म शिकवण्याची आणि त्यांच्या निवासी व्यवस्था केली जाईल. महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी 500 क्षमतेच्या दोन वेगवेगळ्या चार मजली इमारत बांधल्या जाणार आहेत. या इमारतींना लागूनच धम्म सभागृह, धम्म शिक्षकांचे निवासस्थान, स्वयंपाकघर, भोजनकक्ष आणि एकाचवेळी 500 व्यक्ती ध्यानसाधना करू शकतील, असा पॅगोडा उभारला जाणार आहे.
85 कोटीचा प्रकल्प असून, धम्मदानातून उभारण्यात येणाऱ्या धम्मप्रकल्पातून बाबासाहेबांना अपेक्षित समाज घडविण्याचा संकल्प असल्याचे तागडे यांनी माहिती दिली. यावेळी प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानचे सचिव राजरत्न कुंभारे, माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक भि. म. कौसर, माजी जिल्हा माहिती अधिकारी नरेश मेश्राम उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीतील धम्माची आचारसंहिता यांचे पालन करण्यासाठी हा 85 कोटींचा प्रकल्प उभारला आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. तुर्तास धम्मप्रशिक्षण शिबिरांना सुरवात झाली आहे. तीन दिवसीय शिबिर नुकतेच पार पडले, अशी माहिती श्याम तागडे यांनी दिली.
दृष्टीक्षेपातील प्रकल्प :
बुद्धघोष पाली अध्यापन आणि पुनरावृत्ती संस्था, जंबुदीप विहार आणि भिक्खू प्रशिक्षण केंद्र, रमाई शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक केंद्र, तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेब आणि रमाईचा पुतळा.