नागपूर (Nagpur) : अमरावती रोडवर 318 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या दोन पुलांपैकी एका पुलाचे काम हायटेन्शन लाईनमुळे जवळपास तीन महिन्यांपासून रखडले आहे. गुरुद्वारापासून तर वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या 2.4 किमी लांबीच्या पुलाचे केवळ 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.
हा पूल एनएचएआय व पीडब्ल्यूडीद्वारे बांधला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाडी गुरुद्वारा आणि वाडी पोलिस स्टेशन दरम्यानच्या हायटेन्शन लाईनची उंची सुमारे 11 मीटर आहे. पुलाच्या बांधकामासाठी ही वीजवाहिनी 24 मीटर उंच करावी लागणार आहे. त्यासाठी निधीची व्यवस्था होऊ शकली नाही. तसा प्रस्ताव राज्य सरकार आणि वीज विभागाकडे पाठवण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यावर हायटेन्शन लाईनची उंची वाढवली जाईल.
सध्या येथे पुलाच्या तीन स्पॅनचे काम थांबवण्यात आले आहे. आरटीओ चौक ते विद्यापीठ परिसरापर्यंत निर्माणाधीन दुसऱ्या पुलाचे कामही ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. या मार्गावरील पुलाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास वेळेवर परवानगी न मिळाल्याने बांधकामाला विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
6 महिन्यांचा एक्सटेंशन
अनेक कारणांमुळे पुलाचे निर्माण वेळेत होने शक्य नाही. कंत्राटी कंपनीला 6 महिन्यांचा एक्सटेंशन दिला गेला आहे. हाय टेंशन लाईनची ऊंची वाढवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती प्रकल्प अधिकारी उमेर इनामदार यांनी दिली.
दोन वर्षांत दोन पूल पूर्ण करायचे होते
अमरावती रोडवरील आरटीओ समोरील ते विद्यापीठ कॅम्पस पर्यंतच्या पहिल्या 2.85 किमी लांबीच्या पुलाचे बांधकाम आणि वाडीतील गुरुद्वारा ते वाडी पोलिस स्टेशन पर्यंतच्या दुसऱ्या 2.4 किमी लांबीच्या पुलाचे काम 2 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. करारानुसार हे पूल 2 वर्षात पूर्ण करायचे होते.
पहिल्या पुलाचे काम 6 महिन्यांच्या विलंबाने सुरू झाले. हा पूल ऑगस्ट 2024 पर्यंत तयार होणे अपेक्षित आहे, तर दुसऱ्या पुलाचे बांधकाम हाय टेंशन लाइनमुळे रखडले आहे. या पुलाचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून तो जानेवारी 2025 पर्यंत तयार होईल, असे आश्वासन दिले जात आहे. दोन्ही पुलांच्या बांधकामाचे कंत्राट टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे.