Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : गोकुळपेठ मार्केटचा होणार कायापालट; उभारणार अत्याधुनिक 21 मजली मॉल

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : धरमपेठ भागातील गोकुळपेठ मार्केटचा कायापालट करण्यात येणार असून दुकाने, कार्यालये, थिएटर, रेस्टॉरंट यांसारख्या एकाहून एक सुविधांचा समावेश राहणार आहे. सध्याचे गोकुळपेठ मार्केट तोडण्यात येणार आहे. त्यासाठी येथील दुकानदारांना महापालिकेच्या बाजार विभागाने नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे येथील दुकानदारांचे मार्केटमध्ये नव्या पुनर्वसन अत्याधूनिक करण्यात येणार आहे. परंतु नोटीसीमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. गोकुळपेठ मार्केटमध्ये पार्किंगसह अत्याधुनिक 21 मजली इमारतीचे मार्केट प्रस्तावित आहे.

या मार्केटचे डिझाईन तयार करण्यात आले असून नागपूर सुधार प्रन्सास, महापालिका सभा व राज्य सरकारनेही मंजुरी दिली आहे. सध्या गोकुळपेठ मार्केटमध्ये किराणा, मटन मार्केट, भाजी विक्रेत्यांसाठी ओटे आहेत. नव्या प्रस्तावित अत्याधुनिक मॉलसाठी ही जागा रिकामी करण्यात येणार आहे. महापालिकेने जागा रिकामी करण्यासंदर्भात येथील सर्वच दुकानदारांना 23 ऑगस्टला नोटीस बजावली आहे. त्यामुळे येथील दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. नोटीस मिळाल्यापासून दुकानदारांना दहा दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. नोटीसचे उत्तर न दिल्यास दुकानदारांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहित धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही दुकानदारांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

नव्या अत्याधुनिक मॉलमध्ये या दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. परंतु ही इमारत होईस्तोवर काय करायचे, व्यवसायाचे काय, असा प्रश्न येथील दुकानदारांना पडला आहे. जुना बाजार पाडून नवीन 21 मजल्याची इमारत बांधण्याचे नियोजन आहे. या नव्या इमारतीचा आराखडा काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या दुकानांना या इमारतीत सामावून घेतल्यानंतरही 427 दुकाने, कार्यालये विक्रीसाठी उपलब्ध असतील, असे या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

14 हजार चौरस मीटर जागा :

एनआयटीच्या ताब्यातील या जागेचे क्षेत्रफळ 14 हजार 205 चौरस मीटर आहे. इमारतीच्या आराखड्यानुसार पार्किंगसाठी 1 हजार 395 चौरस मीटर आरक्षित आहे. 3 हजार 886 चौ.मी. जागेवर नासुप्रचे व्यापारी संकुल आहे. नवी इमारत बांधल्यानंतर येथील दुकानदारांचे नव्या इमारतीत पुनर्वसन करण्यात येणार आहे.

अशी असेल नवीन इमारत

दुकाने: 297, कार्यालये : 238, ओटा 62, मटण दुकान: 11, रेस्टॉरंट: 1, प्लेयिंग झोन : एक