नागपूर (Nagpur) : शहरात बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात पदभरती झाली नाही. परिणामी विविध विभागात रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात पदभरती करण्याचा निर्णय नागपूर सुधार प्रन्यासने घेतला आहे. यामुळे युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. तसेच दोन नवीन कार्यालयेही बांधण्यात येणार आहेत.
नागपूर सुधार प्रन्यासमध्ये भविष्यात पदभरती केली जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या सदर येथील कार्यालयात पार्किंगची मोठी समस्या बघता सक्करदरा व उमरेड रोडवर नासुप्रची दोन नवीन कार्यालये बांधण्यात येणार आहेत. नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाने नव्या कार्यालयाच्या बांधकामासाठी मंजुरी दिली. याशिवाय पूर्व नागपुरात दिव्यांगासाठी प्राथमिक शाळा व थीम पार्क विकसित करण्यासही हिरवी झेंडी दिली.विश्वस्त मंडळाची बैठक सदर येथील कार्यालयात आज पार पडली. बैठकीत नासुप्रचे सभापती व एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., विश्वस्त आमदार विकास ठाकरे, संदीप इटकेलवार, नगर रचना विभागाच्या सहसंचालक सुप्रिया थूल उपस्थित होते. नासुप्र विश्वस्तांच्या बैठकीत पूर्व नागपुरातील पारडी परिसरातील सूर्यनगरात केंद्र सरकारच्या निधीतून दिव्यांगासाठी प्राथमिक शाळा व थिम पार्क साकारण्यासाठी मंजुरी देण्यात आली.
गुंठेवारीअंतर्गत नियमित केलेल्या ले-आऊटमधील मोकळ्या जागा व सार्वजनिक वापराच्या जागेवर नासुप्रतर्फे वृक्षारोपणाची मोठी मोहिम राबविण्यात येणार आहे. नासुप्रच्या सदर कार्यालयात आता मोठी गर्दी होत आहे. लोकप्रतिनिधी आल्यास त्यांचे वाहन पार्क करण्याकरिता जागेची अडचण होत आहे. याशिवाय भविष्यात पदभरतीचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे नासुप्रचे दोन नवीन कार्यालये सक्करदरा व उमरेड रोड येथे तयार करण्यास विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली.
क्रीडा संकुल देखभालीसाठी खासगी संस्थेकडे
बस टर्मिनलसाठी जागा देताना नियमांचे पालन न केल्याच्या तक्रारीवरून बिल्डरला नोटीस देण्यासाठीही हिरवी झेंडी देण्यात आली. उमरेड रोडवरील रखडलेल्या क्रीडा संकुलासाठी शासनाकडून निधी मागण्यात यावा, क्रीडा संकुल विकसित झाल्यानंतर ते खासगी संस्थेस देखभालीसाठी देण्याबाबतही विश्वस्त मंडळाचे एकमत झाले.