solar project Tendernama
विदर्भ

Nagpur : राज्य सरकारचा भर सौर ऊर्जा प्रकल्पांवर; 1564 कोटी खर्चून उभारणार...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्यात हरित ऊर्जेला प्राधान्य देऊन, महानिर्मिती कंपनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. सध्या महावितरणचे अक्षय ऊर्जा दायित्व पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती कंपनीने केंद्र सरकारच्या सोलर पार्क योजनेअंतर्गत तसेच औष्णिक आणि नवीकरणीय ऊर्जा मिश्रण धोरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे.

मंत्रिमंडळाच्या नुकत्यातच झालेल्या बैठकीत सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

या प्रकल्पांच्या खर्चापोटी 1564 कोटी 22 लाख ऐवजी 1494 कोटी 46 लाख किंमतीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार काऊंटरपार्ट फंडींग प्रकल्पाच्या कमीत कमी 30 टक्के असावे म्हणून सुधारित वित्तीय पॅटर्ननुसार कर्जाचे प्रमाण प्रकल्प खर्चाच्या 85 टक्के ऐवजी 70 टक्के ठेवण्यास मान्यता देण्यात आली. 

केएफ डब्ल्यू कंपनीचे 130 दशलक्ष युरो इतके कर्ज 0.05 टक्के व्याज दराऐवजी 2.84 टक्के प्रती वर्ष या स्थिर व्याजदराने कमाल 12 वर्षात परतफेड करण्यात येईल. हे प्रकल्प यवतमाळ, वाशिम तसेच चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येत आहेत.

चंद्रपूर वीज केंद्र परिसरात 250 मेगावॉटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहे. यापैकी इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 105 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर प्रकल्प आहे. महानिर्मितीचा राज्यातील हा पहिला फ्लोटिंग सोलर प्रकल्प आहे.