नागपूर (Nagpur) : सुमारे सात वर्षांपासून नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला साध्या एका रस्त्याचेही बांधकाम अद्याप पूर्ण करता आले नाही. मात्र या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
नागूरच्या स्मार्ट सिटीला चिन्मय गोतमारे हे नवे उमदे मुख्य कार्यकारी अधिकारी लाभले आहेत. ते मूळचे नागपूरकर आहेत. दोनच दिवसांपूर्वी ते रुजू झाले आहेत. आता त्यांच्यासमोर वर्षभरात स्मार्ट सिटीचे अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आवाहन आहे. स्मार्ट सिटीचा प्रकल्प पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. एकूण १७३० एकर जागेवर हा प्रकल्प आहे. यात एकूण ५२ किलोमीटरचे रस्ता बांधण्यात येणार आहे. यापैकी काही रस्ते ३० तर काही २४ मीटर रस्त्यांचा समावेश आहे. ६५० कोटीचे कंत्राट शापुर्जी पालनजी कंपनीला देण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत पाच वर्षांत एक रस्ताही बांधण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
त्याकरिता अनेकांची घरे तोडण्यात आली. त्यांना अद्याप पर्यायी जागा देण्यात आली नाही. घरकुलाचा प्रस्तावसुद्धा हरवला आहे. आता केंद्र सरकारनेच ही योजनाच बंद केली आहे. जी कामे सुरू झाली तेवढीच पूर्ण करायची आहे. उर्वरित कामासाठी खुल्या बाजारातून भांडवल उभारायचे आहे. पूर्व नागपूरमधील जागेचा वाद, आरक्षण, कोर्टकचेऱ्या आणि पुढाऱ्यांचा हस्तक्षेप बघता ही कामे पूर्ण करण्यासाठी गोतमारे यांना कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. विधान परिषदेत भाजपच्या एका नेत्याने स्मार्ट सिटीची योजना एका अधिकाऱ्यांच्या आग्रहस्तावर नागपूर शहरावर लादण्यात आल्याचा आरोप केला आहे. या भागातील जागेच्या टीडीआरचे घोळही चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे आता सायकल चालवणे आणि दौड स्पर्धा घेणे सोडून गोतमारे यांना मुख्य कामाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.