नागपूर (Nagpur) : स्मार्ट सिटी कंपनीने शहरात विविध ठिकाणी उभे केलेले 12 स्मार्ट ई-टॉयलेटचे युनिट भंगारात जमा झाल्याचे चित्र समोर आले आहे. आता तर कंत्राटदार कंपनीने हात वर केल्याने शिल्लक 38 युनिटही उभे होणार नाही. विशेष म्हणजे एक टॉयलेट आठ लाख रुपयांचे असून देखभाल, दुरुस्ती नसल्याने चांगल्या प्रकल्पाची वाताहात झाल्याचे दिसून येते.
स्मार्ट सिटी कंपनीने 50 ई-टॉयलेट युनिट (एक महिला व एक पुरुषांसाठी, असे 100 ई-टॉयलेट) उभे करण्याबाबत केरळमधील ईराम सायंटिफिक सोल्यूशन लिमिटेड कंपनीला टेंडर दिले होते. 8 कोटी 38 लाखांच्या या टेंडर मध्ये देखभाल, दुरुस्तीचीही जबाबदारीही ईराम कंपनीवर होती. परंतु या कंपनीने आता काम बंद केल्याने हा प्रकल्पच रद्द करण्यात आल्याचे सुत्राने नमुद केले. कंपनीने खामला चौक, जयताळा चौक, रामदासपेठ, कृपलानी चौक, सोमलवाडा आणि जयप्रकाशनगरमध्ये प्रत्येकी एक युनिट उभे केले आहे. एका युनिटमध्ये महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी एक ई-टॉयलेटचा समावेश आहे. अर्थात या सहा ठिकाणी 12 ई-टॉयलेट उभे करण्यात आले. एका ई-टॉयलेटसाठी 8 लाख रुपयांचा खर्च आला. कंपनीने हात वर केल्याने आता देखभाल, दुरुस्तीही होत नसल्याने चांगला प्रकल्प गुंडाळण्यात आला. मागील वर्षी 26 जुलैला स्मार्ट सिटी कंपनीने ईराम कंपनीला 100 ई-टॉयलेट बसवण्याचे काम दिले होते.
कंपनीला 9 महिन्यांत सर्व ई-टॉयलेट उभे करून देखभालही सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता उभे करण्यात आलेले 12 ई-टॉयलेटही भंगारात गेल्याचे चित्र आहे. या ई-टॉयलेटची रचना उत्तम होती. एका युनिटला फारच कमी जागेची गरज असल्याने शहरासाठी उपयुक्त होते. - एवढेच नव्हे सामान्य प्रसाधनगृहाच्या तुलनेत पाणीही कमी लागत असल्याने पाण्याच्या बचतीचीही खात्री होती. सर्व ई-टॉयलेट स्वयंचलित असून पैसे टाका अन् वापरा, अशा प्रकारातील होती. सेंसर प्रणाली असल्याने फ्लशही स्वयंचलित पद्धतीने व्हायचे, असे एका अधिकाऱ्याने नमुद केले.
दोनदा केली मुदतवाढ :
संपूर्ण 50 युनिट उभे करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ईराम कंपनीला दोनदा मुदतवाढ दिली. परंतु कंपनीने केवळ सहा युनिट उभे करून देखभाल, दुरुस्तीलाही हात वर केले. स्मार्ट सिटी कंपनीने ईराम कंपनीसोबत संवादाचीही तयारी केली. परंतु कंपनीने प्रतिसाद न दिल्याने दोनदा कारणे दाखवा देण्यात आली. अखेर मागील पंधरवड्यात स्मार्ट सिटीने कंत्राट रद्द करीत कंपनीची 30 लाखांची सुरक्षा ठेवही जप्त केली. याशिवाय सहा युनिटसाठी स्मार्ट सिटीला एक रुपयाचा खर्च आला नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले