एकता ठाकूर गहेरवार
नागपूर (Nagpur) : दिवसेंदिवस उपराजधानी नागपूर शहरात गुन्हेगारी वाढत चालली असताना सायबर क्राईमच्या घटनेतसुद्धा वाढ होताना दिसत आहे. यावर आळा घालण्यासाठी शहरात लवकरच तीन एकर जागेवर स्मार्ट पोलिस ठाणे उभारले जाणार आहे.
पोलिस आयुक्तालयांतर्गत शहरात एका सायबर पोलिस ठाण्यासह 34 पोलिस ठाणी कार्यरत आहेत. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतसे शहरातील गुन्हेगारीचे स्वरूपही वाढत आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीऐवजी आता सोशल मीडियावरील गुन्हेगारी झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यादृष्टीने पारडी-पुनापूर रस्त्यावर लवकरच दुसरे स्मार्ट पोलिस ठाणे उभारण्यात येत आहे. लकडगंज हे शहरातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणे आहे. हे पोलिस ठाणे पब्लिक यूटिलिटी जागेवर बांधण्यात येणार आहे.
11 कोटी खर्च करून तयार होईल स्मार्ट पोलिस ठाणे -
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत टाऊन प्लॉनिंग केली जात आहे. या परियोजने अंतर्गत मौजा पुनापुर-पारडी-भरतवाडा-भांडेवाडी या क्षेत्राचा विकास करण्यासाठी पायभूत सुखसोईवर जोर दिले जात आहे. या अंतर्गत येथे लवकरच 11 कोटी खर्च करून स्मार्ट पोलिस ठाणे उभारले जाणार आहे.
या कंपनीला मिळाले टेंडर -
स्मार्ट पोलिस ठाणे बांधकामाचा टेंडर हंसवाहिनी कन्स्ट्रक्शन अँड विजय कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळाला आहे. 3 एकर जागेपैकी 25 हजार चौरस फुट जागेवर 3 माळ्याची बिल्डिंग उभारली जाणार आहे आणि बांधकाम सुरु झाले आहे. सध्या नागपूर-भंडारा रोडवरील एका छोट्या इमारतीतून पारडी पोलिस स्टेशन कार्यरत आहे. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने पारडी-पुनापूर रोडवरील पीयू लँड (पब्लिक युटिलिटी) वर पारडी स्मार्ट पोलिस स्टेशन आणि फायर स्टेशन उभारण्यात येत आहे. इमारतीच्या बांधकामासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. पारडी स्मार्ट पोलिस ठाण्यासाठी अंदाजे सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सुमारे 25 हजार चौरस फूट जागेत पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू झाले आहे. पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सजावटीची जबाबदारी नागपूर पोलिसांवर असेल. सर्व सोयीसुविधांनी युक्त इमारत बांधण्यात येणार आहे.
पोलिस ठाण्यासाठी जागा आरक्षित
1730 एकर जागेपैकी 3 एकर जागा स्मार्ट पोलिस ठाणे उभारण्यासाठी पहिलेच आरक्षित करण्यात आली होती. तज्ज्ञांच्या महितीनुसार कोणत्याही पीयू जमिनीवर सरकारी रुग्णालय, शाळा किंवा पोलिस ठाण्याचे बांधकामाचे काम केले जाऊ शकते. अशी जागा जनतेशी संबंधित सुविधांसाठी असते. आमदार कृष्णा खोपडे यांनी लकडगंज पोलीस ठाण्याला जसे स्मार्ट पोलिस स्टेशन बनवण्यासाठी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे पारडी स्मार्ट पोलिस स्टेशनसाठी प्रयत्न केले. मौजा पुनापूर येथील 3 एकर पुनापूर जमिनीपैकी एक एकर पीयू जमीन पारडी पोलिस स्मार्ट ठाण्यासाठी नगर नियोजनाच्यावेळी आरक्षित ठेवली होती. सध्या नवीन पारडी स्मार्ट पोलिस ठाण्याच्या सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. ग्रीन बिल्डिंग अंतर्गत जी प्लस तीन माळ्याची बिल्डिंग लवकरच तयार होणार आहे.
पोलिस ठाण्याची ग्रीन बिल्डिंग असणार
ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी अंतर्गत कमी वापर, उच्च कार्यक्षमता, अर्थव्यवस्था, पर्यावरण संरक्षण, एकात्मता आणि ऑप्टिमायझेशन, सौर ऊर्जा, पावसाचे पाणी साठवण्याच्या सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल. ग्रीन बिल्डिंग हरित बांधकाम किंवा शाश्वत इमारत म्हणूनही ओळखले जाते. ऊर्जा बचत, जमीन बचत, पाण्याची बचत, साहित्य बचत इत्यादींसह संसाधनांची जास्तीत जास्त बचत आहे. त्याच वेळी, संबंधित इमारतीच्या संपूर्ण जीवन चक्रादरम्यान, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि प्रदूषण कमी करणे, लोकांना निरोगी, आरामदायक वातावरण प्रदान करणे हे ग्रीन बिल्डिंगचे उद्दिष्ट असते.