Crime Tendernama
विदर्भ

त्या ठेकेदारांवर मोक्का लावणार?; इतर संस्थाही लवकरच रडारवर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महापालिकेच्या शाळांचे पोषण आहाराचे धान्य बाजारात विकणाऱ्या ठेकेदारांवर मोक्का लावण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात सुसंस्कार महिला बचतगटाच्या चंद्रशेखर भिसीकरसह सहा जणांना अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी अहफाज पठाण वल्द अशफाक पठाण (वय २२, रा. खरबी), चंद्रशेखर प्रभाकर भिसिकर(वय ४५, रा. तांडापेठ), अमोल भिसीकर, सोनू शमी पठाण, मोनू शमी पठाण, सतिश निर्मलकर यांना अटक केली आहे. ११ ऑक्टोबरला चारचाकी वाहनातून तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून यशोधरानगर येथे अवैधरित्या तांदूळ विक्रीसाठी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी सापळा रचून वाहन अडवित चालकाला पकडले. यावेळी वाहनात २ टन तांदळाची पोती असल्याचे आढळून आले. त्यात पोलिसांनी सारा आणि सीया ट्रेडर्सच्या गोदामाची तपासणी करीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. याशिवाय चंद्रशेखर भिसीकरच भाऊ अमोल भिसीकर याच्यासह चंद्रशेखरकडून धान्याची खरेदी करणाऱ्या सतिश निर्मलकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

इतर संस्थाही लवकरच रडारवर
केंद्रीयकृत आहाराच्या वाटपात असलेल्या संस्थांनीही बरीच बनावट कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेला पोलिसांनी पत्र दिले आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि महापालिकेद्वारे याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने इतर संस्थाची तपासणी करण्यात पोलिसांना अडसर जात असल्याचे दिसून येते.

दबावात अधिकारी?
पोषण आहार मिळविणाऱ्या बहुतांशी बचतगट या एका विशिष्ट राजकीय पक्षासी निगडीत आहे. त्याच्या वरदहस्तानेच हे कंत्राट त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे याबाबत महापालिका आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांवर त्यांच्या चौकशीसंदर्भात कुठलीच कारवाई होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे इतर बचतगटांची चौकशी थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे.