Pardi Flyover Tendernama
विदर्भ

Nagpur : मोदींनी उद्घाटन केलेला पारडी उड्डाणपूल कधी पूर्ण होणार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 2014 मध्ये पारडी उड्डाणपुलाच्या (Pardi Flyover) बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. जून 2016 मध्ये, गेनॉन डंकर्ले एंड कंपनी लिमिटेड आणि मेसर्स एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम सुरू करण्यात आले या प्रकल्पाची एकूण किंमत 649 कोटी रुपये असून त्यापैकी 448.28 कोटी रुपये नागरी बांधकामावर खर्च करण्यात आले.

एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्रीराम मिश्रा यांनी हा प्रकल्प 36 महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा केला होता. आता मे-2023 पर्यंत भंडारा रोड, कळमना मार्केट, इतवारीपर्यंत पूल बनून तयार होईल, असे सांगण्यात येत आहे. 7 वर्षात पारडी चौकात अनेक रस्ते अपघात झाले आहेत. काहींना जीवही गमवावा लागला. तरीसुद्धा सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

पारडी उड्डाणपूल 5 भागात विभागला आहे. एक भाग एचबी टाऊन चौकापासून पारडी नाका पूर्वेला 1.19 किमी, दुसरा भाग एचबी टाऊन ते इतवारी 1.1 किमी पश्चिमेला, तिसरा भाग कळमना ते एचबी टाऊन 1 किमी, चौथा भाग एचबी टाऊन ते मानेवाडा 1.3 किमी आणि पाचवा भाग राणी प्रजापती चौक ते वैष्णवदेवी चौक असा 700 मीटरचा भाग आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावलेले नाहीत. अनेक भागांत बांधकामे अपूर्ण आहेत. ठिकठिकाणी बांधकामाचे साहित्य पसरले असून त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना अपघात होण्याची शक्यता आहे.

वाहन पार्किंगसाठी जागा नाही

एचबी टाऊन चौकात सुरू असलेल्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. येथे वाहन पार्किंगसाठी जागा नाही. दुकानदार व व्यावसायिकांना वाहने उभी करताना मोठी अडचण होत आहे. कंत्राटदार कंपनी बांधकामाचे काम अत्यंत संथ गतीने करत आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यात जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप नागरिकांनी लावला आहे.

असा आहे प्रकल्प...

26 मार्च 2012 रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. संजीव जयस्वाल यांनी पारडी पुलासाठी अर्थसंकल्पात 6 कोटींची तरतूद केली. 3 ऑक्टोबर 2012 नंतर महापौर अनिल सोले यांनी तत्कालीन एमएसआरडीसी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे 50 टक्के निधीची मागणी केली. 15 जानेवारी 2013 स्थायी समिती डीपीआर 70 कोटींची तरतूद केली.

14 जून 2014 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पारडी पूल प्रकल्प एनएचएआय द्वारे पूर्ण केल्याची घोषणा केली. स्थायी समितीने 12 ऑगस्ट 2014 मध्ये 358.16 कोटींचा सुधारित प्रस्ताव तयार करून त्याची जबाबदारी एनएचएआय वर सोपवली. आणि

21 ऑगस्ट 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारडी उड्डाण पूल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. 20 मे 2015 मध्ये एनएचएआय ने 624 कोटींच्या सुधारित प्रकल्पाचा तपशील तयार केला. नोव्हेंबर 2015 निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आणि गेनॉन डंकर्ले एंड कंपनी लिमिटेड ला कंत्राट देण्यात आले.

649 कोटींच्या या प्रकल्पांतर्गत एकूण 6 किमी उड्डाणपूल, 14 कि.मी. 4 लेन रोड, 2 रेल्वे अंडरब्रिज, नाग नदीवर 2 पूल आणि 22 बसशेड तयार करावे लागणार आहेत. पूर्ण होण्यासाठी सेट केलेली टाइमलाइन आतापर्यंत अपूर्ण आहे.

विविध कारणांमुळे उशीर

पारडी उड्डाणपूल प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याची अनेक कारणे दिली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आवश्यक असलेली जमीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आली नाही. 1.18 हेक्टर जागेवर उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिका, राज्य सरकार आणि मेट्रो विभागाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाला. जून 2018 मध्ये महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून मेट्रोसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.

राणी प्रजापती चौकातील 86 चौरस मीटर जागा सोडून उर्वरित जागा सप्टेंबर 2020 मध्ये उपलब्ध करून देण्यात आली. पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीची समस्याही एक कारणीभूत होती. एचबी टाऊन जंक्शनवरून वाहतूक वळविण्याची परवानगी 18 सप्टेंबर 2021 रोजी देण्यात आली. याशिवाय भूमिगत जलवाहिनी, इलेक्ट्रिक केबल, बीएसएनएल केबल, सीवरेज लाईन आदींचे नियोजन करण्यास बराच कालावधी लागला आहे.

वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था नाही, गोमती हॉटेल चौकात वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था नाही. सिग्नल बंद आहे. वाहतूक पोलिस तैनात नव्हते. अनियंत्रित वाहतुकीमुळे लोक अपघाताला बळी पडत आहेत. येथे नेहमीच वाहतूक कोंडी असते. गेल्या काही वर्षात 4-5 गंभीर अपघात झाले असून त्यात काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 77 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. बहुतांश उड्डाणपूल तयार असून येत्या 3 महिन्यांत हा पूल वापरासाठी उपलब्ध होणार आहे. 3.5 किमी. आणि 7.5 किमी. दोन सिमेंट रस्ते तयार आहेत. एचबी टाऊन जंक्शन येथे 24 गर्डर पूर्ण झाले आहेत. याशिवाय रेल्वे अंडरब्रिज बांधण्यात आला, तर नाग नदीवर 2 पूलाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प 2019 मध्ये पूर्ण होणार होता, जो मे 2023 नंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

77 टक्के काम पूर्ण पारडी

उड्डाणपुलाचे 77 टक्के काम पूर्ण झाले आहे. काँक्रिटीकरणाचे काम बाकी आहे. या कामासाठी नेमका किती वेळ लागेल याचा अंदाज लावता येत नाही. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक बंद ठेवता येत नाही, त्यामुळे विलंब होतो. मानेवाडा - प्रजापतीनगर चौकाचे काम सुरू झालेले नाही. जमीन उपलब्ध झाल्यावरच येथे काम सुरू होईल. कळमना मार्केट, भंडारा रोड, इतवारीपर्यंत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 3 महिन्यांत येथे वाहतूक सुरू होईल. अशी माहिती  एनएचएआय चे प्रकल्प अधिकारी अरविंद काळे यांनी दिली.