नागपूर (Nagpur) : ब्रिटिशांनी रामटेक शहरालगतच्या नवरगाव शिवारातील दोन नैसर्गिक टेकड्यांचा आधार घेत सूर नदीवर खिंडसी जलाशयाची निर्मिती केली. याचे लाभक्षेत्र नागपूर जिल्ह्यातील 70 आणि भंडारा जिल्ह्यातील 40 अशी 110 गावांमधील 8,903 हेक्टर ठरविण्यात आले. वास्तवात, या जलाशयाचे पाणी सिंचनासाठी मिळत नसल्याने याची सिंचन उपयोगिता शून्य असल्याचा दावा या जलाशयाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.
धानाच्या पिकाला सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ब्रिटिशांनी 1867-68 मध्ये या जलाशयाच्या निर्मितीची योजना आखली होती. जलाशयाच्या कामाला सुरवात मात्र सन 1906 मध्ये करण्यात आली असून, 1913 साली जलाशयाचे काम पूर्ण करण्यात आले. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे, तसेच रामटेक व मौदा तालुक्यातील काही गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणे हा या जलाशयाच्या निर्मितीमागचा मूळ उद्देश होता. 229.20 मीटर लांब आणि 22.19 मीटर उंच असलेल्या या जलाशयातून वर्षाकाठी किमान 98.20 दलघमी पाणी सहज उपलब्ध होते.
जलाशयासाठी 13 गावकऱ्यांची जमीन गेली
खिंडसी जलाशयाच्या निर्मितीसाठी रामटेक तालुक्यातील नवरगाव, पंचाळा (बु.), पंचाळा (लहान), माद्री, महादुला, पिपरा (पेठ) यासह 13 गावांमधील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. मात्र, जलाशयाच्या निर्मितीनंतर या गावांमधील शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्याऐवजी त्या विकोपास गेल्या आहेत.
जलाशयाच्या पाण्याखालचे क्षेत्र किती?
या जलाशयाची लांबी 229.20 मीटर असून, उंची 22.19 मीटर आहे. याच्या पाण्याखालचे (जलमग्न) क्षेत्र 2.127 हेक्टर आहे. याची एकूण पाणीसाठा क्षमता 105.12 दलघमी असून, यात 104.26 दलघमी हा उपयुक्त, तर 0.858 दलघमी हा मृत पाणीसाठा आहे.
कुणीही लाभार्थी नाही
या जलाशयाच्या निर्मितीसाठी काही शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन देण्यास नकार दिला होता. त्यांच्यासह शेतजमिनी देणारेही या जलाशयाचे आजवर लाभार्थी होऊ शकले नाही, असेही अनेक जाणकार व्यक्तींनी सांगितले.
मोबदला मिळाला अन् खर्चही झाला
या जलाशयासाठी ब्रिटिशांनी शेकडो हेक्टर शेतजमीन अधिग्रहित करून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलाही दिला. हल्ली या पिढीतील कुणीही हयात नसल्याने तसेच सरकार दप्तरी नोंद नसल्याने कुणाला नेमका किती आर्थिक मोबदल देण्यात आला, याची माहिती उपलब्ध नाही.
130 गावांतील शेतकऱ्यांना लाभ?
या जलाशयातील पाण्याचा लाभ 130 (8,903 हेक्टर) गावांमधील धान उत्पादकांना होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. यात नागपूर जिल्ह्यातील 70 (4,452 हेक्टर) आणि भंडारा जिल्ह्यातील 40 (4,451 हेक्टर) गावांचा समावेश आहे. वास्तवात, या जलाशयातील पाणी सिंचनासाठी कधीच सोडले जात नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
या जलाशयातील पाणी रामटेक शहरासह तालुक्यातील नगरधन व इतर गावांना पिण्यासाठी दिले जाते. मात्र, जलाशयालगतच्या महादुला, पंचाळा (बु.). नवरगाव यासह 18 गावांना मात्र दरवर्षी पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या जलाशयामुळे सिंचन व पिण्यासाठी पाणी मिळणार असल्याचे फार पूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, या दोन्ही समस्या सुटल्या नाहीत, अशी माहिती महादुला गावातील शेतकऱ्यांनी दिली.