Nagpur News नागपूर : अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड तेल्हारा 13 किलोमीटर रस्ता बांधकामाचे काम सुधीर कंस्ट्रक्शनला मिळाले होते. याच रस्त्याचे उपकंत्राट मुंबईचे बिष्णू मोहंती यांना मिळाले. 25 सप्टेंबर 2019 रोजी या कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली. हे टेंडर 29 कोटी 25 लाखांचे होते. त्यातील 5 कोटींचे रस्त्याचे काम कंत्राटदार बिष्णू मोहंती यांनी पूर्ण केले. कंत्राटदाराने कर्ज घेऊन रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र मागील 2 वर्षांपासून बिलासाठी त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यलयाच्या चकरा माराव्या लागत आहे.
या रस्त्याची मोजणी, स्थळ निरीक्षण, पंचनामा अशा सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर कामाचे देयक 2 वर्षेपूर्वी टाकले ते मंजूर झाले. मात्र अद्यापही त्या कामाचे बिल कंत्राटदाराला मिळाले नाही. उर्वरित बिल 4-5 कोटी एवढी रक्कम कंत्राटदार बिष्णू याने मजुरांना दिली. अकोला सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांना वारंवार भेटून बिल देण्याची मागणी केल्यावर निधी उपलब्ध आहे तुमचे पेमेंट देतो, असे सांगत झुलवत ठेवले.
आत्महत्येचा इशारा
राहण्यासाठी घर नाही, कुटुंबियांचे पालनपोषण कसे करावे, मुलांना शिक्षण कसे द्यावे या सर्व प्रश्नाचे उत्तर कंत्राटदाराने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन मागितले, तसेच संपूर्ण कुटुंबियांसोबत आत्महत्या करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी सुधीर कंस्ट्रक्शनचे संचालक शीशीर खंडार, शरद खंडार, सार्व. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, सहाय्यक अभियंता प्रवीण सरनाईक आदींची असेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे, अशी माहिती कंत्राटदार विष्णू चरण मोहंती यांनी नागपुरात दिली.
बिष्णु मोहंती यांची मुंबई येथे विष्णू इंटरप्राईजेस नावाने कंपनी असून ते 1301, साई-सिद्धी अर्पाटमेंट विक्रोली, मुंबई येथील रहीवाशी आहेत. प्रो.शिपमध्ये मोहंती यांनी नागपूरच्या सुधीर कंस्ट्रक्शन्स सोबत रस्ता डांबरीकरणाचे कंत्राट घेतले. पण सुधीर कंस्ट्रक्शनने फसविले अजून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा झाल्याने त्यांनी मुंबईतील दोन्ही घर विकून मजुरांचे पैसे फेडले. मात्र गिट्टी व मुरुमवाल्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांनी गृहमंत्री फडणवीसांच्या शहरात येऊन न्यायाची मागणी केली आहे. तसेच अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सरनाईक यांना संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणात काही न बोलण्याची भूमिका घेतली आहे.