Road Tendernama
विदर्भ

Nagpur News : मनसर रामटेक तुमसर रस्ता का बनलाय धोकादायक?

टेंडरनामा ब्युरो

Nagpur News नागपूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, मनसर-रामटेक तुमसर रोडवर ग्रामपंचायत खैरी-बिजेवाडा अंतर्गत वाहिटोला येथील सर्व्हिस रोडसह नाली बांधकाम 5 वर्षे उलटून गेली तरीही अर्धवट आहे.

बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनी ला राष्ट्रीय महामार्ग 753 चे बांधकामाचे टेंडर मिळाले होते. या कंपनीने कासवगतीने या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण तर केले पण काही काम अद्यापही अर्धवट स्थितीत पडलेले आहे. या अर्धवट कामामुळे अनेक अपघात झाले तर दोन लोकांना आपला जीव गमवावा लागला. परिसरात विद्युत व्यवस्था सुद्धा नाही. त्यामुळे येथील स्थानिक लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. 

अर्धवट कामे त्वरीत करण्याची  मागणी खैरीचे (बिजेवाडा) सरपंच रणवीर यादव यांनी केली. त्यांनी सांगितले की, मनसर-रामटेक तुमसर या रस्त्याचे बांधकाम बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आले होते. कंपनीने मनसर-रामटेक तुमसर रोडवर ग्रामपंचायत खैरी-विजेवाडा अंतर्गत वाहिटोला येथील सर्व्हिस रोड, नाली बांधकाम आणि विद्युत व्यवस्थेची कामे अपूर्णच ठेवली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरीकांची गैरसोय होत आहे. 

वाहिटोला रेल्वे क्रॉसिंग लगत 500 मीटर पूर्वेस व 500 मीटर पश्चिमेस सर्व्हीस रोड, रस्ता दुभाजक आणि विद्युत व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे अर्ध्या गावात अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे या ठिकाणी रस्त्यावर अपघातात दोन जणांचा मृत्यु देखील झाला.

बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेडकडून रस्त्यावरील सर्व विद्युत व्यवस्था 4 वर्षेपर्यंत सुरळीत संचालन करून स्थानिक प्रशासनाला हस्तांतरीत करून घ्यावयाचे आहे. परंतु कंपनीमार्फत विजबिलाचा खर्च वाचविण्याकरीता रात्रीस 12-1च्या नंतर ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत सर्व विद्युतरोषनाई बंद करण्यात येते. फक्त रस्त्यावरील अर्धे विद्युत खांब सुरू ठेवण्यात येतात. त्यामुळे अंधारात मोठ्या वाहनांचा अपघात घडून रेल्वे क्रॉसिंगपलीकडे मनसर रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेल्या रस्तादुभाजक भिंतीला ट्रक किंवा मोठी वाहने आदळतात. 

तसेच ठिकठिकाणी मोठ्या वाहनांचे अपघात घडून विजेची खांबे रस्त्यालगत पडलेली आहेत. त्या खांबांनाही पुर्नस्थापीत करून सुरू करण्यात आले नाहीत. विद्युत खांबांकरीता वापरण्यात आलेल्या लोखंडी खांबांची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असून छोट्या वाहनांच्या धक्क्यानेही ते वाकतात. यावरून अंदाजपत्रकात ठरलेल्या मानकानुसार असलेली खांबे वापरली नसल्याचे दिसून येते.