Indian Railway Tendernama
विदर्भ

Nagpur News : नागपूर विभागातील 'या' 15 रेल्वे स्थानकांचा बदलतोय चेहरा-मोहरा; काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

Nagpur News नागपूर : अमृत ​​भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत नागपूर विभागातील 15 स्थानकांचा कायापालट केला जात आहे. येथे काम वेगाने सुरू आहे. याशिवाय आता या स्थानकांवर 29 लिफ्ट आणि 14 एस्केलेटर बसवण्यात येणार असून, त्यानंतर प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होणार आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील स्थानकांवर एकूण 29 लिफ्ट बसवण्यात येणार आहेत. यात साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्त खर्च येणार आहे. सोबतच विविध स्टेशनवर 14 एस्केलेटर बसवले जातील, ज्यामुळे प्रवाशांना एफओबीपर्यंत पोहोचणे सोपे होईल. हे संपूर्ण काम अमृत भारत स्टेशन अंतर्गत होणार आहे. सध्या, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील 15 स्थानकांच्या कायापलटाचे काम सुरू झाले आहे. 

रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. दपूम नागपूर विभागातील 15 रेल्वे स्थानके पहिल्या टप्प्यात विकसित केली जाणार आहेत. यामध्ये नागपूर विभागातील 15 स्टेशनवर एकूण 29 नवीन लिफ्ट बांधण्यात येणार आहेत. वृद्ध, आजारी आणि अपंग प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

याशिवाय स्टेशनवर प्रगत आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज वेटिंग हॉल, जेवण, पिण्याचे पाणी, ATM, इंटरनेट, वॉशरूम, झाकलेले शेड, मानक संकेत, नैसर्गिक प्रकाश आणि वायुवीजन यासारख्या अत्यावश्यक सुविधांमुळे स्टेशनला ग्रीन झोन चे स्वरूप आले आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिक व अपंगांना सुविधा युक्त होणार असे काम केले जात आहे. 

स्थानिक कला आणि संस्कृती लक्षात घेऊन स्टेशनची रचना आणि देखावा सुधारण्याचे काम केले जात आहे. यामुळे प्रवासी संख्या वाढण्याबरोबरच रोजगार वाढण्याची दाट शक्यता असून, त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे. 

सध्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत एकूण 15 रेल्वे स्टेशन (गोंदिया, वडसा, चंदाफोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, डोंगरगड, राजनांदगाव, बालाघाट, नैनपूर, मंडलफोर्ट) बांधली जात आहेत. सुमारे 223 कोटी रुपये खर्चून, सिवनी, आमगाव आणि छिंदवाडा स्टेशनच्या पुनर्जीवनाची तयारी सुरू आहे.

ट्रॅकच्या विकासाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यानंतर त्याचा परिणाम गाड्यांच्या वेगावर दिसू लागला आहे. गाड्यांची गती 50 वरून 90 आणि ताशी 90 वरून 110 किलोमीटर करण्यात आली आहे.

गाड्यांची गती वाढवण्यासाठी विविध विभागांवर पायाभूत सुविधांची कामे वेगाने केली जात आहेत. यामध्ये मल्टीट्रॅकिंग (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ओव्हरहेड उपकरणांचे नियमन, सिग्नलिंगची कामे आणि इतर तांत्रिक कामे यांचा समावेश होतो.