Nagpur News नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी आणि नाले सफाईचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने युद्व पातळीवर काम सुरू आहे. नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तिन्ही प्रमुख नद्यांची आतापर्यंत एकूण 90 टक्के स्वच्छता झालेली आहे.
15 जूनपर्यंत नदी स्वच्छतेच्या कामाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिन्ही नद्यांच्या सफाई अभियानाने गती पकडली आहे.
या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देउन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे. नाग नदीची लांबी 16.58 किमी, पिवळी नदीची लांबी 17.42 आणि पोहरा नदीची लांबी 15.17 किमी आहे. यापैकी या तिन्ही नद्यांचे एकूण 90 टक्के काम झालेले आहे.
नाग नदीची 13.19 किमी, पिवळी नदीची 16.22 किमी आणि पोहारा नदीची 12.26 किमी सफाई पूर्ण झालेली आहे. तिन्ही नद्यांच्या सफाईमधून 15 पोकलेनद्वारे 112745.17 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. 15 जून 2024 पूर्वी शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये व सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.